गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (08:33 IST)

सातारा : तख्ताच्या वाडय़ात आढळून आला रांजण

udyan raje bhosale
सातारा :गुरुवार बागेच्या परिसरातील तक्ताचा वाडा येथे सतराव्या शतकातील ऐतिहासिक रांजण आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिकेने गुरुवार बाग परिसरातील समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे, अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत. तख्ताचा वाडा परिसरातील ऐतिहासिक ठेवा वाचवण्याकरता या समाज मंदिराला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा साताऱयातील इतिहास प्रेमींनी तसेच माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के यांनी दिला आहे.
 
गुरुवार बाग परिसरामध्ये तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी तख्ताच्या वाडय़ाचे बांधकाम केले होते. हा परिसर तब्बल आठ एकर होता. पैकी साडेचार एकरवर आता विविध इमारतींचे अतिक्रमण झाले आहे. उरलेल्या साडेतीन एकरच्या जागेला वाचवण्यासाठी इतिहास प्रेमींची धडपड सुरू आहे. वाडय़ाच्या जागेमध्ये नगरपालिकेने समाज मंदिराला परवानगी दिल्याचे समजताच काहींनी हरकत घेत याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच त्यांनी या प्रकाराची कल्पना खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. उदयनराजेंनी तात्काळ गुरुवारी गुरुवार भाग येथील तख्ताचा वाडा परिसराला भेट दिली.
 
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी आरोग्य सभापती रविंद्र झुटिंग, जिज्ञासा विकास मंच निलेश पंडित आदी उपस्थित होते. या जागेची पाहणी करून खासदार उदयनराजे भोसले यांनी हे समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे अशा स्पष्ट सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान येथे 17 व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा रांजण मातीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आहे. यावरूनच या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते.असे असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही परवानगी दिलीत कशी असा खडा सवाल सुहास राजे शिर्के यांनी केला आहे.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor