रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 4 जानेवारी 2017 (10:38 IST)

मानवी जीवनात संवाद आवश्यक – रजिया सुलताना मुक्त विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली

लहान संवादांतूनच कुटुंब फुलतात. माणूस हा समाजशील असून त्याला एकटेपणातून बाहेर पडणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस एकमेकांत, नात्यांतील संवाद कमी झाल्याने मानवी आरोग्य घातक बनले आहे. संवाद नसणे मानवी आयुष्यासाठी चिंतेची बाब असून समाजजीवनात स्री-पुरुष ही दोन्ही चाके समांतर चालणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी आज नाशिक येथे बोलताना व्यक्त केले. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘शहरी कुटुंबाच्या समस्या’ या विषयवार विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रा. प्रवीण घोडेस्वार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे होते.  
 
रजिया सुलताना पुढे बोलताना म्हणाल्या, दातृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व म्हणजेच स्री. आजकाल लहान सहान गोष्टींवरून कौटुंबिक कलह निर्माण होत असून त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. स्वातंत्र्यानंतर आजही बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली. सत्ता, संपत्ती आणि सेक्स याआयामांमुळे गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचे सांगतानाच विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी त्यांनी विविध उदाहरणे देवून स्पष्ट केले. शारीरिक संबंधांवरून समाजात विकृती निर्माण होत असून लैंगिकतेबाबत कुटुंबात संवाद होणे आवश्यक आहे. शरीर सुखाची गुलाम पिढी घडत बाब खेदाची असल्याचे सांगतानाच, आजकाल लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांत वाढ झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. 
 
आपण आजवरच्या आयुष्यात माणसात देव शोधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून आपल्या जीवनात सावित्रीबाई मोठा आदर्श असून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. सांस्कृतिक वारसा लाभलेले नाशिककर सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगात असल्याचे आपल्याला अनुभवयास मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इथली परंपरा, संस्कृती आणि माणसांतील आपलेपणामुळे या शहराबद्दल आपुलकी निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. राजेंद्र वडनेरे यांनीही मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी केले. प्रा. विजया पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राजक्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. 
 
दरम्यान सकाळी मुख्य इमारतीत झालेल्या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वित्त अधिकारी मगन पाटील, उपकुलसचिव सुवर्णा चव्हाण, सेवा सुविधा विभागाचे प्रमुख सुनील बर्वे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.