सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (08:02 IST)

‘स्कूल चले हम जीएसटी के साथ’,आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे – मा. छगन भुजबळ

chagan bhujbal
विधानसभेत ‘महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२’ या विधेयकावर बोलत असताना आमदार मा. छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याबद्दल सरकारवर टीका केली. तसेच राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतले वजन वापरून ही जीएसटी वाढ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

अन्नपदार्थांसह जीवनाश्यक वस्तू याआधी करमुक्त होत्या. मात्र अन्नपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला. तुम्ही कुठल्याही मार्गाने टॅक्स वाढवता तेव्हा त्याचा फटका शेवटी सामान्य माणसालाच बसतो, असे मा. भुजबळ यांनी सांगितले. शाळेतील मुलांच्या पेन्सिल, रबरवर देखील जीएसटी वाढवला. हॉस्पिटल्सच्या बिलात देखील जीएसटी लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीत सहभागी केले आहे. त्यांनी त्यांचे वजन वापरून केंद्र सरकारच्या निदर्शनास सामान्य व्यक्तीचे दुखणे लक्षात आणून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच केंद्र सरकार सांगतंय की, देशात आर्थिक मंदी नाही. मग तुम्हाला जीएसटी वाढविण्याची गरजच काय? असा थेट प्रश्नही मा. भुजबळ यांनी उपस्थित केला. शाळेच्या वस्तू, अन्नधान्यावर जीएसटी लावला, आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी असल्याचा टोला मा. भुजबळ यांनी लगावला.