कोरोना वाढल्यामुळे औरंगाबादमध्ये शाळांना पुन्हा सुट्टी
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत पुन्हा वाढ होत आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी शहरातील इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यांचे वर्ग पुर्वीप्रमाणेच ऑनलाईनपद्धतीने सुरु राहील. परंतु १० वी, १२ वीच्या बोर्ड परिक्षा असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मुभा दिली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांड्ये यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने व काही शाळांमध्ये कोरोना रुग्ण अढळल्याने कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये, शाळांमधून कोरोनाचा प्रसार अधिकप्रमाणात होऊ नये म्हणून इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातून शहरातील १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेत न येता पुर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग करावेत, असेही प्रशासक पांड्ये यांनी सांगितले. त्याबाबत सर्व शाळांना सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही बंदी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.