गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:02 IST)

रथ सप्तमी पूजा विधी आणि कथा

रथ सप्तमी पूजा विधी
 
माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय.
 
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्‍त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. 
 
रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणार्‍या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्याप्रकारे देवळाला महत्त्व प्राप्‍त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे `रथसप्‍तमी’ ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते.
 
रथसप्तमी  पूजाविधी
 
रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे. 
सूर्यादेवाची १२ नावे घेऊन १२ सूर्यनमस्कार घालावे. 
पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. 
त्याला तांबडी फुले वाहावीत. 
सूर्याला प्रार्थना करून आदित्यहृदयस्तोत्रम्, सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम्, यांपैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे. 
खिरपूरीचा नैवेद्य दाखवावा. 
 
सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात. या बारा राशींचे प्रतिक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. 
 
अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
 
 
रथसप्तमी कथा
श्रीकृष्णाचा मुलगा शाम्ब याला स्वत:चा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाचा मुलास माहिती नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शाम्ब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला “तुझे शरीर कुष्ठरोगी होईल”.
 
तसेच घडले ही, अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शाम्ब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला.