शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”- अतुल भातखळकर
राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं ट्विट केलं असून, टोला लगावला आहे.
“शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.
मा. @PawarSpeaks साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो. pic.twitter.com/w1iatu9T43
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2021
“मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय”
भातखळकर यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शरद पवारांचं मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधलं आहे. “शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.