रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन

फोटो साभार - सोशल मीडिया 
महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव  यांना वयाच्या 92 व्या वर्षी कॅन्सरची लागण झाली आहे. त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, वय वर्षे 92 सुरु आहे, हाडे ठिसूळ झालीत, मणकाही त्रास देतोय, निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधी मागे लागल्या आहेत, असं सांगत कॅन्सरची लागण झाल्याचे डॉ. बाबा आढाव  यांनी सांगितले आहे. तसेच लवकर मी या आजारावर मात करेन, असा विश्वासही डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.
 
काय म्हटले निवेदनात
 
माझ्या भावंडांनो, सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता. सध्या मला 92 वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका  त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे.
 
तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. 92 वर्षात उपचाराला मर्यादा आहेत. अभिजीत वैद्य (Abhijeet Vaidya) हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी , डॉ. विजय रमणम या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे. माझ्या मते हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
 
मात्र माझ्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील. कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामूळे व त्यावरील औषधोपचारामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरू शकते. बसल्या जागेवरून जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच, असे डॉ. बाबा आढाव यांनी म्हटले आहे.