मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (15:46 IST)

समीर वानखेडेविरोधातील आरोपांसोबत पुरावे सादर करा – क्रांती रेडकर

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी धर्म बदलल्याचा दावा केला आहे; पण मलिक यांचा दावा वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी फेटाळून लावला आहे. यासाठी आपल्या लग्नाचे फोटोच रेडकर यांनी सोशल मीडियात पोस्ट केले. याच पार्श्वभूमीवर आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आरोप कोर्टात करा टि्वटरवर नको असा टोला नवाब मलिक यांना लगावला आहे.
 
 मुंबई ड्रग्स केसमध्ये गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत समीर वानखेडेंवर खोट्या केस दाखल करणे पैशांच्या वसुलीसह अनेक गंभीर आरोप केले. दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या बेछूट आरोपांना आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतं. पत्र लिहिणाऱ्याने समोर येऊन आरोप करावेत, असे आव्हानही क्रांती रेडकर म्हणाल्या.
 
या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निनावी पत्राबाबत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेवर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. अशा प्रकारचं निनावी पत्र कुणीही पाठवू शकतो. ज्या पत्रावर कुणाचेही नाव नाही, कुणीही जबाबदारी घेत नाही, अशा पत्रावर आणखी काय बोलणार, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना दिले.
 
आज सकाळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला होता.