राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. पुण्याचे पालक मंत्री यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणाऱ्या भारतीय जनतापार्टीचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राजकीय पक्ष , सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पडसाद आज चिंचवड गावात कार्यक्रमासाठी आलेले पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पिंपरी -चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटीलांवर शाईफेक करण्यात आली असून पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी- चिंचवड मध्ये आले असता कार्यकर्त्याचा घरून निघताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या. अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या.
चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
आपल्या वक्तव्यावरून टीका होत असताना पाटील यांनी काल औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये आपली व्हायरल होत असलेली व्हीडिओ क्लिप पुन्हा एकदा प्रसार माध्यमांना ऐकवत ते म्हणाले, “मी काय म्हटलं, हे मी सांगण्यापेक्षा दर्शकांनी लाईव्ह पाहिलं आहे. त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मी फक्त एवढंच बोललो की शाळा कोणी सुरू केल्या? तर या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या आणि हे महापुरुष सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे पैसे मागितले."
"कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर लोकांकडे जाऊन धान्य मागितलं. आताच्या काळात या सगळ्याला वर्गणी किंवा सीएसआर म्हणतात. मात्र तेव्हा वेगळी भाषा होती. त्यामुळे सीएसआरच्या माध्यमातून संस्थांना बळकटी द्यावी लागेल, एवढंच माझं म्हणणं होतं,' असं पाटील यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "झोपलेल्या जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. मीडियामुळे लोकांना ही क्लिप ऐकायला मिळाली. त्यानंतर लोक म्हणाले यात तर काहीच आक्षेपार्ह नाही."
"मला याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही फोन आला होता आणि त्यानेही यात नेमकं काय आक्षेपार्ह आहे, असं विचारलं. माझंही तेच सांगणं आहे आणि लोकांचंही समाधान झालेलं आहे. 'ध' चा 'मा' करणं एवढंच काम विरोधी पक्षांना आता उरलेलं आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, "मी कसा चुकलेलो नाही, याबाबत आता दलित संघटनाच पत्रक काढत आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करणारे विरोधी पक्ष तोंडघशी पडले,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Edited by - Priya Dixit