बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:19 IST)

सरकार विरोधात असहकार आंदोलन छेडू, शरद पवार यांचा सरकारला इशारा

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास सरकारविरूद्ध शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही असहकार आंदोलन सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी दिला. नाशिक येथे झालेल्या शेतकरी-शेतमजूर अभियानांतर्गत राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी सरकारवर चौफेर टीका केली. शरद पवार म्हणाले की शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची नियतच नाही म्हणून आता सरकारला सामूहीक शक्तीची ताकद दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही असे दिसू लागले आहे. शेतकऱ्यांचे सर्व स्वरुपाचे कर्ज माफ व्हायलाच हवे असे सध्या तरी चित्र आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांची सरसकट कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफी देण्याची या सरकारची दानतच नाही असा आरोप त्यांनी सरकारवर केला तसेच शेतकरी वर्गाने आत्महत्या करू नये अशी विनंती त्यांनी केली.

आपल्या देशात सरकारचे इंधनावर कोणतेच नियंत्रण दिसून येत नाही. नवीन कर लागू झाला आणि देशात लगेच लूट सुरू झाली आहे. यामध्ये रोज इंधनाच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक संतापले आहेत. देशातील सर्वात दुर्दैवी निर्णय नोटाबंदीचा झाला असेही ते म्हणाले. नोटाबंदीनंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे. कोणता फायदा झाला हे कोणालाही सांगता येत नाही असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

शेतीवर मत व्यक्त करताना पवार म्हणाले की आपल्या देशात आज शेतीमालाच्या किमतीची अवस्था फार भयानक आणि बिकट झाली आहे. या नवीन सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्वस्थ झाला आहे. शेतकरी जरी वीस टक्के असला तरी त्याच्या हातात अर्थव्यवस्था आहे हे विसरू नका, शेतमालाच्या किमतीचा खेळ करू नका, हे सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारने योग्य पाऊले लगेच उचलणे गरजेचे आहेत अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की आज बळीराजा गप्प आहे जर शेतकरी रस्त्यावर उतरला आणि त्याने आंदोलन केले तर आपल्या राज्य आणि देशाला परवडणार नाही.

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका

नाशिक जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याची खंत वाटते. तुम्ही असे केल्याने तुमचे घर उद्ध्वस्त होते. शेतकऱ्याला आत्महत्या नाही तर संघर्ष शोभतो. आपल्या मागे राहणाऱ्या परिवाराकडे पहा आणि असा कोणताही मार्ग निवडू नका असे भावनिक आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.