शीतल म्हात्रेंच्या ‘त्या’VIDEOची महिला आयोगाकडून दखल
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत शीतल म्हात्रे या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रेंनी हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घडामोडींनंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. या व्हिडीओप्रकरणी गृहविभागाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी आणि यामागील नेमकं सत्य समोर आणावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली. त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून ही मागणी केली आहे. या ट्विटमध्ये चाकणकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टॅग केलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor