मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (11:58 IST)

अडीच वर्षं घराबाहेर न पडणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा- एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोमणा

eknath uddhav
शेतात जायला हेलिकॉप्टर वापरणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर होत असते. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिले. अडीच वर्षं घराबाहेर न पडणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा, अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे. आमच्या सरकारने धान उत्पादकांना प्रती हेक्टर मदत करण्याचा मोठा निर्णय घेतल्याचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला. हे सरकार टर्म पूर्ण करेल. या पुढच्या निवडणुकीत झेंडा पण आमचा आणि अजेंडा पण आमचाच असेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
 राज्यातून उद्योग जाण्याला आमचं सरकार कारणीभूत नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 
सरकार बदललं नसतं तर विदर्भात अजूनही अधिवेशन झालं नसतं, असंही ते म्हणाले. अडीच वर्षांत विदर्भासाठी कोणता निर्णय घेतलात असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला.
 
ते म्हणाले, "आम्ही 70 हजार कोटींच्या गुंतवणूकीचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी 44 हजार कोटींचे प्रकल्प फक्त विदर्भातील आहेत. एनडीआरएफचे नॉर्मस् बदलून आम्ही शेतकर्‍यांना मदत केली. आम्ही मुंबई आणि ठाण्यात 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने करणार आहोत."
 
50 माणसं चूक आणि मी एकटाच बरोबर, असं कसं होईल?
एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये आपल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 
 
“आम्ही रेशीमबागेत गेलो, आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. सहन करण्याची मर्यादा असते. जे प्रबोधनकारांचे वारसदार आहेत ते लिंबू फिरवण्याची भाषा करत आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. आम्ही वर्षावर राहायला उशीरा गेलो. आधी म्हटलं तिथे जे असेल ते आधी काढा... पाटीभर लिंब सापडली. कोणाला बोलताय? ज्यांना तुमची अंडी पिल्ली माहितीयेत. हिंमत असेल तर मैदानात लढा असं म्हणत आहेत. जे घरातून बाहेरच पडत नाहीत ते हिंमतीची भाषा करतात हा मोठा विनोद आहे. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे. तुम लढो, हम कपडे संभालते हे, अशा स्वभावाचे ते नव्हते.” 
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांच्या अपमानाबद्दल केलेल्या भाषणावरही त्यांनी उत्तर दिलं. 
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. तुम्ही ध चा मा करताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाकडे कोणी पुरावे मागितले? संभाजी राजे छत्रपतींकडे खासदारगीवेळी प्रतिज्ञापत्र कोणी मागितलं? टोमणे गटाचे नवशिके प्रवक्ते कोणाला जिजाऊंचा उपमा देतात. संतांचा अपमान करतात. त्याबद्दल कोण सांगणार?
 
महाविकास आघाडीच्या कामकाजावर बोलताना ते म्हणाले, "सरकारच्या विरोधात कोणी बोललं तर तिथे महापालिकेचा जेसीबी जायचा. घराचं मोजमाप करून त्यावर बुलडोझर चालायचा. कंगना राणावतचं घर तोडावं म्हणून एका वकीलाना 80 लाख रूपये दिले. हे कोणाचे पैसे आहेत. गिरीश महाजनांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. त्याला मोक्का लावून आत टाकण्याचा कार्यक्रम केला होता. ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला. ज्यांचा एक मंत्री दाऊदशी संबंध आहे म्हणून जेलमध्ये गेला त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारावा. काही लोक म्हणाले, मला आता सत्तेचा मोह नाही. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. आमदारकीचाही राजीनामा देतो. काय झालं? बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला तर ते कधीही मागे हटत नव्हते."
 
अजित पवार म्हणाले...
यावर विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले, “आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नव्हती. जे बाहेर बोलतायेत त्यावर इथे तुम्ही बोलताय. त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे?  आपल्या मुलाच्या वयाच्या लोकांचं तुम्ही मनावर घेता. कशाला? मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना... एक प्रवक्ता ठेवा बोलायला. सहा महिन्यांपूर्वी काय झालं हे आम्ही सर्वांनी पाहिलं. तुम्ही बाहेरच्या टीका मनाला लावून घेऊन त्यावर बोलणं हे लोकांना नकोय. त्यांना काय मिळणार याचं उत्तर कोण देणार?” 
 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी मविआचे विधिमंडळ सचिवांना पत्र
 
विधानससभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र लिहिले आहे.
 
महाविकास आघाडीतील 39 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत.
 
सुनिल केदार, सुरेश वरपूडकर, यांच्या सह्या या पत्रावर आहेत. विरोधी पक्षातील सदस्यांना अध्यक्षांकडून समान वागणूक मिळत नसल्याची तक्रार या नेत्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
 
'सोडून गेलेल्या नेत्यांनीच विचार करावा हे लोक आपल्याला आधार देताय की गाडताय'
भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत ते फक्त शिंदे गटातील मंत्र्यांवरच होत आहेत, तेव्हा शिंदे गटातील नेत्यांनीच हा विचार करावा की आपल्या हे नवे साथीदार आधार देत आहेत की गाडत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.
 
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की गेल्या काही दिवसात फक्त शिंदे गटाच्याच नेत्यांवर आरोप होत आहेत हे लोक आधी तुमच्याच शिवसेनेत होते आता तेव्हा यावर तुम्ही काय सांगाल, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,
 
की "आम्ही सरकारमध्ये असताना हे आरोप नव्हते झाले. ज्यावेळी माझ्या मंत्रिमंडळातील नेत्यावर आरोप झाले तेव्हा मी एक राजीनामा घेतला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आता शिंदे गटातील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. "याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टींना माझा पाठिंबा होता. आता या नेत्यांनीच विचार करायची गोष्ट आहे की आपल्याला साथ मिळत आहे की तेच लोक आपल्याला गाडत आहेत."
 
एकनाथ शिंदे यांनी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इशारा देऊ इच्छितो की तुम्ही सावध राहा. कदाचित तुमच्या संस्थेवरही हे लोक आपला दावा सांगतील."
 
दिशा सालियन प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले ज्या विषयाशी आपला काहीच संबंध नाही त्यावर भाष्य का करावे.
 
'अजितदादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवलं नाही'
आज विधानसभेमध्ये उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर शरसंधान केले.
 
विरोधी पक्षनेते अजित पवारांना ते म्हणाले की शरद पवारांनी तुम्हाला संधी असून देखील मुख्यमंत्री केले नाही. 2004 साली तुमचे आमदार जास्त होते तुम्हाला मुख्यमंत्री करण्याची संधी चालून आली होती पण त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही असं फडणवीस म्हणाले.
 
याआधी अजित पवार म्हणाले होते मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही तक्रार घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे नेणार आहोत. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हे बोलण्याआधी तुम्ही सुनेत्राताईंची ( अजित पवार यांच्या पत्नी) परवानगी घेतली होती का? विदर्भातील जिल्हा बॅंकाना पुनरुज्जीवन देण्याचा विचार फडणवीस यांनी मांडला.
 
ते म्हणाले की विदर्भातील आत्महत्यांना खासगी बॅंका किंवा खासगी सावकारांमुळे आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याला कुठेतरी चाप बसणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बॅंका हव्यात. ज्या सुविधा जिल्हा बॅंका देतात त्या खासगी बॅंका देऊ शकत नाहीत असं फडणवीस म्हणाले.
 
Published By- Priya Dixit