मुहूर्त’ शोरूमच्या मालकाकडून कर्मचाऱ्याला डांबून ठेवत बेदम मारहाण
नाशिक : शर्ट चोरल्याच्या संशयावरून नव्याने सुरू झालेल्या मुहूर्त शोरूम मधील सेल्समनला मालकाने सुरक्षारक्षकांच्या मदतीने 1 दिवस डांबून ठेऊन त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठक्कर डोम जवळ मुहूर्त नावाचे कपड्याचे शोरूम नव्याने सुरू झाले आहे. या शोरूममध्ये विशाल सुधाकर वाहुलकर (वय: २४) हा सेल्समन म्हणून काम करतो.
26 डिसेंबर रोजी या शोरूमचे मालक रितेश जैन व विनीत राजपाल यांनी दुकानातील 3 सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला शर्ट चोरल्याच्या संशयावरून डांबून ठेवत बेदम मारहाण केली. एक दिवस डांबून ठेवल्यानंतर 27 तारखेला रात्री त्याची सुटका झाली. तो घरी परतल्यानंतर त्याने ही आपबिती आपल्या कुटुंबास सांगितली. त्याला उपचारासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले आणि हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्याचा आज जबाब घेतला. या प्रकरणी विशाल वाहुलकर याच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात रितेश जैन, विनीत राजपाल आणि अभिषेक सिंग यांच्यावर भारतीय दंड विधान ३२४, ३४२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२५६/२०२२)
दरम्यान ऍड. अजिंक्य गीते यांनी विशाल वाहुलकर याची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी विशाल याने सर्व आपबिती ऑन कॅमेरा कथन केली. यावेळी विशाल म्हणाला “मला वरच्या पायऱ्यांवरून ओढत ग्राउंड फ्लोअरला आणलं. त्यावेळी सर्व स्टाफ आणि सिक्युरिटी जमा झाले आणि मला मारहाण केली. मला मॉलमध्ये बांधून ठेवलं होतं. मला लाकडाने, रॉडने मारहाण करण्यात आली. रात्रभर माझा छळ केला., त्यांनी मला माझ्या घरी फोन करायला सांगितला. आणि ऑडिट चालू आहे मी सकाळी घरी येईल असे सांगायला लावले. त्यानंतर मला पाहते पाच वाजेपर्यंत खूप मारलं. त्यानंतर ते मला सकाळी जेवायला ठक्करला घेऊन गेले. तेथून मला त्यांनी स्टाफ कॉटेजमध्येच बांधून ठेवलं.. मला जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. त्यानंतर मला पैशाची मागणी करण्यात आली. माझ्या आईकडून त्यांनी २० हजार रुपये घेतले.. मी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मला न्याय मिळावा”. असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor