शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (14:28 IST)

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ : मुख्यमंत्री माझ्या कानात काहीतरी बोलले, त्यातला एक शब्द मला ऐकू आला - नारायण राणे

मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि मी भेटलो. इथे आल्यावर माननीय मुख्यमंत्री माझ्या कानात काहीतरी बोलले. त्यातला एक शब्द मला ऐकू आला, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
 
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
 
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या विमानतळाचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं.
 
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले.
 
यावेळी बोलताना राणे पुढे म्हणाले, "हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. अशाक्षणी राजकारण करू नये असं वाटत होतं. त्यासाठीच मी इथं आलो. चिपीवरून उडणारं विमान डोळे भरून पाहण्यासाठी मी इथे आलो."
"1990 साली मला बाळासाहेबांनी सिंधुदुर्गात पाठवलं. जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर प्यायला पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, अनेक गावांना वीज नव्हती. शाळा असतील तर वर्ग नाहीत, शिक्षक नाहीत अशी अवस्था होती. मेडिकल इंजिनियरिंग सोडाच.
 
"मुंबईच्या मनीऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी फक्त सांगतोय. कोणी केलं हे लोकं ठरवतील. उद्धवजी, हे सगळं साहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं."
 
राणे पुढे म्हणाले, "टाटा इन्स्टिट्यूटने 481 पानांचा रिपोर्ट दिला. पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास होऊ शकतो हे सांगितलं होतं. 1995 साली सेनेची सत्ता आली, मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. त्यावेळी हा देशातला एकमेव पर्यटन जिल्हा होता. आज 10वी 12वीच्या निकालात पहिले सात आठ विद्यार्थी असतात, त्याला कोण कारणीभूत आहे हे जनता जाणते. हे माझं नाही, साहेबांचं क्रेडिट आहे.
 
"सी वर्ल्ड कोणी कॅन्सल केलं? विचारा सगळ्यांना. आदित्य ठाकरेंनी इथला अभ्यास करावा, 481 पानांचा टाटाचा रिपोर्ट वाचावा. माझ्यावेळा जेवढी धरणाची कामं झाली, त्याच्या 1 टक्का काम पुढे गेलेलं नाही. आज एअरपोर्टलाही पाणी नाही. विमानतळ झाला. विमानातून उतरल्यावर लोकांनी काय पहावं? खड्डे पाहावेत का?"
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांतील या दोन नेत्यांमधील राजकीय कलगीतुरा बघता आज नेमके काय फटाके फुटणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर नेतेही उपस्थित आहेत.
 
या कार्यक्रमावेळी बोलताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, "कोकणाची जादू आजपासून जगाला दाखवू शकू याचा आनंद आहे. कोकणात जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातली लोकं कशी येतील, याची जबाबदारी घेतो. पर्यटक आणत असतानाच पर्यावरण जोपासायची जबाबदाराही घेतो."
 
गोव्यात अजून एक विमानतळ होणार असलं तरी आपण चांगली सेवा दिल्यास जगभरातून पर्यटक इथं येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
 
"या विमानतळाचा फायदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना होईल. यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. जगभरातून पर्यटक येतील आणि कोकणात आर्थिक सुबत्ता नांदेल," असंही ते म्हणाले.
 
कार्यक्रमाआधी कोण काय म्हटलं?
चिपी विमानतळ निर्मितीबाबत राणे म्हणाले, ''या विमानतळाचे सारे श्रेय हे माझे आहे. शिवसेनेचे नेते कितीही दावा करीत असले तरी त्यांनी विमानतळासाठी काहीही के लेले नाही. उलट शिवसेना नेत्यांनी कोकणात कोणतेही विकासाचे काम सुरू झाल्यावर कामांमध्ये अडथळे आणून ठेकेदारांकडून गाड्या पदरात पाडून घेतल्या.'
 
विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष आपण सारे काही बोलणार आहोत. शिवसेना नेत्यांचा विमानतळाच्या श्रेयाचा दावा कसा चुकीचा आहे याकडेही लक्ष वेधणार असल्याचे राणे यांनी सांगितलं होतं.
 
नाव लघू आकारात असल्याने नाराजी
राज्य सरकारने विमानतळ उद्घाटनाच्या छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी छापले आहे. शिवाय हे नाव दोन्ही नेत्यांच्या नावाहून लहान आकारात छापण्यात आल्याचं सांगत नारायण राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणात स्वागतच आहे, पण मुख्यमंत्र्यांनी नुसती हजेरी लावू नये तर कोकणाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली होती. पर्यटनाला चालना देणारा सी वर्ल्ड प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने बंद केला. या प्रकल्पाला निधी देण्याची मागणी राणे यांनी केली होती.
 
दरम्यान विमानतळाच्या निर्मितीच्या श्रेयावर दावा करणारी फलकबाजी शिवसेना आणि नारायण राणे यांच्या समर्थकांनी केली आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलकही जिल्ह्यात जागोजागी लावण्यात आले आहेत.
 
विरोधी पक्षांना निमंत्रण नाही
चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना आमंत्रित करण्यात न आल्याने दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. चिपी विमानतळ उभारणीत फडणवीस यांचे योगदान आहे आणि मी कोकणातील असूनही आमंत्रित करण्यात आले नाही. हे सरकार राजकीय अभिनिवेशातून वागत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
 
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं बांधकाम 2014 साली झालं होतं. पण डीजीसीए आणि 'एअरपोर्ट ऑथोरिटीकडून' काही दुरूस्त्या सुचवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून काही परवानग्या बाकी होत्या. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानतळावर 'ट्रायल' घेण्यात आली होती.