मग पवारांना प्रचारासाठी फिरविणे अमानवी नाही का
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत 2006 पासून बिघडलेली आहे. त्यानंतरही ते पक्षासाठी फिरत आहेत. या वयातही प्रचारासाठी त्यांना कसब्यात बोलावण्यात आले. त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केला.
खासदार गिरीष बापट आजारी असताना त्यांना प्रचारात उतरविण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत 2006 पासून बिघडलेली आहे. त्यानंतरही त्यांच्या इच्छाशक्ती, शारिरीक बळाला मानले पाहिजे. राष्ट्रवादीत शरद पवार हे एकच कार्यकर्ते आहेत. बाकी केवळ भाषणे करणारे नेते आहेत. आता पवारांना या वयात प्रचारासाठी उतरविणे योग्य आहे का? ते अमानवी नाही का, असा प्रश्न त्यांनी केला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुक ही केवळ दोन राजकीय पक्षातील उमेदवारांपुरती मर्यादित निवडणूक नाही. तर, ही विधानसभेची निवडणूक आहे. त्याठिकाणी राज्याचे कायदे तयार होतात. राज्याची विविध धोरणे ठरतात आणि त्यामुळे ही निवडणुक भाजप विरुद्ध काँग्रेस आहे. आता काँग्रेस देशात, राज्यात नाही टिकली, तर गल्लीत कशी टिकणार? देशात त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आलेले नाही. लोकसभेत एकूण सदस्यांचे दहा टक्के सदस्य असणे विरोधी पक्षनेतेपदासाठी महत्त्वाचे आहे. तेवढे खासदारही काँग्रेसचे देशभरात निवडून आलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor