सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (07:51 IST)

तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ आणि अक्षय कुमारचे संरक्षण करेल : आठवले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करील तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करील. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
 
अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले.