1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (22:01 IST)

मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण

namaj
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागावर पाऊस नाराज असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, याच पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम बांधवांनी मुंशी शहा दर्गा येथे दुवा पठण करून वरुणराजास साकडे घातले.  मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी विशेष दुवा पठण अदा केली. या विशेष प्रार्थनेसाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते.
 
मागील दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढलेली आहे. चांगला पाऊस पडावा सगळीकडे शेत शिवार फुलावे, नद्या, धरणे तुडूंब भरुन वाहावे यासाठी नाशिकच्या मालेगाव मध्ये ‘ऑल इंडिया सुन्नी जमीअतुल इस्लाम’च्या वतीने विशेष दुवा पठण करून पावसासाठी अल्लाला साकडे घालण्यात आले. दरम्यान मुंशी शहा दर्गा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत पावसासाठी विशेष दुवा पठण केले.
 
यावेळी मौसम नदी काठावरील दर्गापर्यंत यावेळी मिरवणूकही काढण्यात आली. दरम्यान, पावसाळा३ सुरू होऊन दोन महिने झाले असताना अद्यापही नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी फिरवली नसल्याचे चित्र आहे.
 
तुरळक पावसाच्या सरी वगळता तालुक्यात कुठेही जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली नाही. शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच खरीप पिकाच्या पेरण्या केल्या; परंतु नंतर पाऊसच नसल्याने खरिपाची पिके करपू लागली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
 
नाशिक शहरात ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेकदा गोदावरीला पूर येत असतो. मात्र यंदा एकही पूर अनुभवयास मिळालेला नाही. त्यामुळे नाशिककर देखील चिंतातुर आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor