बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (16:09 IST)

SSC Board Exam: दहावीच्या परीक्षेबाबत आज अंतिम निर्णय?

सीबीएसई, एसएससी आणि आयसीएई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केलीय.
 
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज (19 मे) सुनावणी होणार आहे. त्यामुळे रद्द केलेली दहावीची परीक्षा पुन्हा होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.
सोमवारी (17 मे) या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचे सांगितलं. तसंच राज्य माध्यमिक मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डाने निकाल जाहीर करण्याचे सूत्र अद्याप ठरवलं नसल्याची माहिती कोर्टाला दिली.
 
तिन्ही बोर्डांना परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यावर कोर्टात आज सुनावणी होईल.
12 मे रोजी राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
 
दरवर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असतात.
 
आज अंतिम निकाल?
पहिल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तिन्ही बोर्ड आणि महाराष्ट्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज कोर्टात राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याबाबत भूमिका मांडणार.
 
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण एसएससी बोर्डाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. तेव्हा राज्य सरकार कोर्टात दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होईल याची माहिती देण्याची शक्यता आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड, राज्य सरकार आणि पालक संघटना आपली भूमिका कोर्टासमोर मांडतील.
 
"दहावीची परीक्षा रद्द करणे हा निर्णय चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसंच तिन्ही बोर्डाची निकाल जाहीर करण्याची पद्धत आणि सूत्र वेगवेगळे असल्याने भविष्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच परीक्षेशिवाय निकाल देणे अनैतिक आहे." अशी भूमिका याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी मांडली आहे.
 
पालक संघटनेची हस्तक्षेप याचिका
यासंदर्भात इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशन या पालक संघटनेनेही याप्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कोणताही निकाल जाहीर करण्यापूर्वी कोर्टाने पालक संघटेचीही बाजू ऐकावी अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे.
पालक संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. सीबीएसई बोर्डाप्रमाणे एसएससी बोर्डाने तात्काळ निकालाचे सूत्र ठरवावे अशी आमची मागणी आहे."
 
एसएससी बोर्डानेही इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून निकाल जाहीर करावा पण एखादा विद्यार्थी मिळालेल्या मार्कांनी समाधानी नसल्यास त्याला परीक्षा देण्याची संधी मिळावी अशीही मागणी पालक संघटनेनी केली आहे.