सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (13:36 IST)

अर्धनग्न आंदोलन करत एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाचा निषेध

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे तरी सरकारला जाग येत नाही. म्हणून सरकार आणखी किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल अकोला आगारातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. अकोलातील जुन्या बसस्थानकातील आंदोलनस्थळी विशाल अंबलकार यांना श्रद्धांजली अर्पण करुन कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
 
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला असून अकोला शहरातील आगार क्रमांक एक आणि दोनमध्ये दररोज आंदोलन करून कर्मचारी आपल्या मागण्या मांडत आहेत. गुरुवारी आगार क्रमांक एक जुने बसस्थानक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. 
 
यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील रिसोड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनीही अर्ध नग्न आंदोलन करत महाराष्ट्र शासनानं निषेध केला. राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांचा लढा दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत असून मागणी लवकर मान्य न झाल्यास आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.