सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (16:18 IST)

14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ‘या’ तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन?

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात एका दिवशी विक्रमी 63 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पाऊल उचलली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
 
राज्यात लॉकडाऊन लागू केला तर आर्थिक नुकसान कसं भरुन काढायचे ? लॉकडाऊनचा कालावधी किती असावा यावर रविवारी टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मात्र राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत टास्क फोर्सचे आहे. त्यामुळे राज्यात गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. यात 14 एप्रिल मध्यरात्रीपासून ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. 14 एप्रिल मध्यरात्री ते 30 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत हा कडक लॉकडाऊन असण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
 
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवस वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे. या कालावधीत राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवाव्या लागणार आहेत. सरकारने आता लॉकडाऊन केले नाही तर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखापर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकार लॉकडाऊन दरम्यान कठोर निर्बंध लावणार आहे.
 
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरु शकते. कोरोनाच्या नव्या लाटेला थोपविण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणे कठीण आहे, अशी भूमिका टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. जर लॉकडाऊन केला नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही टास्क फोर्सने दिला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत केलेल्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान 14 दिवसांपासून ते 3 आठवड्यापर्यंत लॉकडाऊन करावा अशी शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे.
 
मंत्रिमंडळाची 14 एप्रिलनंतर होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.