1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:06 IST)

सिटी लिंककडून विद्यार्थ्यांना पाससाठी मिळणार भरघोस सवलत

नाशिक शहरात शासन निर्णयानुसार आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या नवीन शहर बस वाहतूकीत विद्यार्थ्यांना पासमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.ही सवलत ६६ टक्के असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीतर्फे शहर बससेवेच्या दुसऱ्या टप्प्यात २२ मार्गांवर ८१ बस चालविल्या जात असून, घटस्थापनेच्या मुहूर्तावर आणखीन ४४ बस सुरू केल्या जाणार आहेत.
 
सोमवार (ता.४) पासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी पासमध्ये ६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाइन पासची व्यवस्था असून, पुढील आठवड्यापासून ऑफलाइन पास उपलब्ध करून दिले जाणार आहे. एक महिन्याचा पास घेतल्यास त्यांना प्रवासी भाड्यात ५० टक्क्यांची सूट असणार आहे. तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पास घेतल्यास प्रवासी भाड्यात ६६ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. पाससाठी विद्यार्थ्याचे ओळखपत्र व शाळेचे शिफारसपत्र अर्जासमवेत सादर करणे आवश्यक आहे.
 
नाशिक- सिन्नर बससेवा:
बससेवेच्या तिसऱ्या टप्प्यांत नाशिक- सिन्नर बससेवेला सोमवारपासून सुरवात करण्यात आली .नाशिक- सिन्नर, निमाणी- सिन्नर, सिन्नर- निमाणी, सिन्नर- तपोवन अशा चार मार्गांवर दर अर्धा तासाचे बस सोडल्या जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त शहरात नाशिक रोड ते बोरगड व्हाया जेल रोड, नारायणबापूनगर, हनुमाननगर,आरटीओ कॉर्नर, तसेच नाशिक रोड ते भुजबळ नॉलेज सिटी व्हाया शालिमार, सीबीएस, पंचवटी, हिरावाडी, अमृतधाम या बससेवा नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.