शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2024 (09:25 IST)

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहायात भरीव वाढ

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती. ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. आता नऊ हजार रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असून निकष व कार्यपध्दतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. ही मासिक अर्थसहाय्याची रक्कम शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल. ही रक्कम डीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल. गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे. राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय मिळेल.

Edited By - Ratnadeep Ranshoor