शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (15:11 IST)

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांचं 'नो कमेंट' आणि एक ट्वीट...

supriya sule
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.
 
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत दिल्लीत घोषणा केली.
 
दिल्लीत राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली.
छगन भुजबळ एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "खरं सांगायचं तर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी देणार असल्याची मला कल्पना होती. निवडणुका जवळ येत आहेत, अशावेळी जबाबदारी देणं आवश्यक होतंच. कामाचं वाटप करण्यात आलंय."
 
विश्वास सार्थ ठरवेन - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिलीय.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
तसंच, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार."
 
अजित पवारांचं 'नो कमेंट' आणि ट्वीट
विधापसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांना या माध्यमातून पक्षाने डावललं आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये दिसून येते.
 
गेल्या महिन्यातील शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यादरम्यान अजित पवार यांच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष करण्यात आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हा प्रश्न होता.
 
एका ठिकाणी कार्यक्रमात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांकडून प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात आला. त्याला अजित पवार यांनी नो कमेंट म्हणत उत्तर देणं टाळलं.
पण सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीवर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे."
 
"आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!"
 
पवारांचा आधी राजीनामा, मग माघार
2 मे 2023 रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
 
मात्र, 2 मे रोजीच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले होते की, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे."
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं होतं की, "रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे."
 
मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतला होता.
 
राजीनामा मागे घेताना 5 मे 2023 रोजी शरद पवार म्हणाले होते की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे."
 
Published By- Priya Dixit