बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (13:32 IST)

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

supriya sule
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.
 
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत दिल्लीत घोषणा केली.
 
दिल्लीत राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली.
 
2 मे 2023 रोजी काय घडलं होतं?
2 मे 2023 रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
 
मात्र, 2 मे रोजीच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले होते की, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे."
 
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं होतं की, "रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे."
 
मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतला होता.