बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (08:15 IST)

‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा, घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात........

महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे. पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱया पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत,” अशा शब्दात शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. 
 
“राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे तसे कारण नव्हते. हे आंदोलन सुरू असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. ठाकरे यांनी कडक शब्दांत सांगितले की, ‘राज्यपाल महोदय, घटनेनुसार तुम्ही राज्यपाल पदाची शपथ घेतली. तुम्हाला देशाची घटना, सेक्युलॅरिझम मान्य नाही काय? आणि तुम्हाला आमच्या हिंदुत्वाची उठाठेव करण्याची गरज नाही. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले? मुख्य म्हणजे या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचेही वस्त्रहरण झाले,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
 
“राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती. भारतीय जनता पक्षाचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. या पदाची एक प्रतिष्ठा व शान आहे तशी ती मुख्यमंत्री पदाचीही आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे. हिंदुत्वाचा अपमान करणाऱया, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱया एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या राज्यपालांना हटवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.