हाच आमच्यात आणि भाजपात फरक - संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त होत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, संजय राऊतांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. आता, कोणाच्या फोटोला जोडे मारणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर, याप्रकरणावर फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.
“राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र, आम्ही तसे केले नाही. आम्ही राहुल गांधींचा बचाव केलेला नाही, हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुसरं कोणी काही बोललं असतं तर भाजपाने थयथयाट केला असता. पण, आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरीही तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील त्यांचे प्रेम खरे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच महाराष्ट्रातील जनता राज्यपालांना माफी मागायला लावेल, असेही राऊत यांनी म्हटले.
आता यांच्या फोटोला जोडे मारणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं विधान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करता का? सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना जोडे मारण्याची भाषा करता मग आता अशी विधानं करणाऱ्या राज्यपाल आणि प्रवक्त्यांना जोडे मारणार आहात का?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपावर कडाडून टीका केली.
Edited By -Ratnadeep Ranshoor