'ते' स्टेटमेंट शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण होण्यासाठीच : शरद पवार
शिवसेनेने राज्यात भाजच्या सरकारमध्ये सहभागी होऊ नये, अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. सेना-भाजपमध्ये अंतर वाढावं हाच आमचा प्रयत्न होता. पण जेव्हा शिवसेना भाजच्या सरकारमध्ये सामिल होणार असं वाटलं तेव्हा भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं स्टेटमेंट मी जाणीवपूर्वक दिलं, गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. २०१४मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं होतं. त्यावेळी रंगलेल्या सत्तानाट्यावर भाष्य करताना सहा वर्षानंतर पवारांनी ही कबुली दिली
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या शेवटच्या आणि अंतिम भागात पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. २०१४मध्ये पवारांनी कोणकोणत्या राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला. याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाची त्यांच्या खास शैलीत खिल्लीही उडवली. २०१४ साली तुम्हाला भाजपबरोबर सरकार स्थापन करायचं होतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तशी तुमची चर्चाही सुरू होती, असा देवेंद्र फडणवीस यांनी ठाम दावा केला आहे. त्यावर तुमचं काय उत्तर आहे? असा सवाल संजय राऊत यांनी पवारांना केला. त्यावर पवार आधी मिश्किल हसले आणि त्यानंतर त्यांनी एकावर एक धक्कादायक विधानं करायला सुरुवात केली. फडणवीस जे म्हणाले ते माझ्याही वाचनात आलं आहे. पण गंमत अशी आहे की त्यावेळी ते कुठे होते माहीत नाही? भाजपच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं काय स्थान होतं हे सुद्धा मला माहीत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना हे माहीत झाले. त्यापूर्वी विरोधी पक्षातील एक जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना भाजपमधील देशाच्या आणि राज्याच्या नेतृत्वात बसून निर्णय घेण्याचा अधिकार होता, असं मला माहीत नाही, असा चिमटा पवारांनी काढला.
एका मी जाणीवपूर्वक एक स्टेटमेंट केलं होतं. शिवसेना-भाजपचं राज्यात सरकार बनू नये म्हणून स्टेटमेंट केलं होतं. शिवसेना भाजपबरोबर जाऊ नये ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. त्याला कारणंही तशी होती. पण शिवसेना आता भाजपबरोबर जाणारच असं दिसलं तेव्हा जाणीवपूर्वक स्टेटमेंट केलं. आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो, असं आम्ही भाजपला जाहीरपणे सांगितलं. शिवसेना भाजपपासून बाजूला व्हावी हाच त्यामागचा हेतू होता. पण ते घडलं नाही. शिवसेनेने भाजपबरोबर सरकार बनवलं. त्यांनी भाजपबरोबर सरकार बनवलं त्याबद्दल वाद नाही, असंही पवार म्हणाले.
भाजपच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या आणि भाजपच्या मित्रपक्षांच्या हिताचं नाही, हे आम्ही जाणून होतो, म्हणून शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये हा आमचा प्रयत्न होता. दिल्लीची आणि राज्याची सत्ता हातात असल्यावर शिवसेना किंवा त्यांच्या इतर मित्रपक्षांचा लोकशाहीतील काम करण्याचा अधिकारच भाजप मान्य करणार नाहीत. त्यामुळे आज ना उद्या शिवसेनेसह मित्रपक्षांना भाजप धोका देणार हे आम्हाला माहीत होतं, म्हणून ती आमची राजकीय चाल होती, असं सांगतानाच फडणवीस जे सांगत आहेत. ते मला मान्य नाही. उलट शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक पावलं टाकली हे मी मान्य करतो, असं पवार म्हणाले. पवारांनी असं म्हणताच आज तर भाजप-शिवसेनेत अंतर पडलेलं आहे, असे उद्गार राऊत यांनी काढले. त्यावर पवारांनी स्मित हास्य केलं.