शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (21:20 IST)

१३ वर्षीय गीतने अवघ्या एका मिनिटात केली ३९ योगासने; चार बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

लवचिकता, प्राविण्य, चिकाटी अन् जिद्दीच्या जोरावर अवघ्या तेरा वर्षीय गीत पराग पटणीने एका मिनिटात तब्बल ३९ योगासने करीत विक्रमाला गवसनी घातली आहे. तिने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह चार विक्रम नोंदविले आहेत.
नाशिक येथे गीत योगा फाउंडेशनमध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे देणाऱ्या गीतने या विक्रमासाठी मोठी मेहनत घेतली. सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे आव्हान सहज पेलले. तिच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
गितने एक मिनिटांच्या कालावधीत वीरभद्रासन, उर्ध्व वीरभद्रासन, दंडेमान जानू सिरासन, हनुमानासन, पादंगुष्टासन, पद्मसर्वांगासन यासह अनेक अवघड अशाप्रकारचे योगासने सादर केले. यावेळी तिने केलेल्या या विक्रमाची विविध रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. आता तिचे लक्ष्य गिनिज बुक ऑफ रेकॉर्डकडे असून, लवकरच त्याबाबतची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे तिने स्पष्ट केले. दरम्यान, गितने आतापर्यंत अनेकांना योगाचे धडे दिले असून, तिच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले आहे. गितच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वयाच्या साडेचार वर्षापासून योगाचे धडे
गीतला वयाच्या साडेचार वर्षातच योगबद्दल आकर्षण वाटू लागले. आई काजल पटणी या योगगुरू असल्याने, त्यांच्याकडूनच तिला योगाचे बाळकडू मिळाले. पुढे तिची योगबद्दलची रूची वाढत गेली. पुढे वयाच्या दहाव्या वर्षानंतर तिने योगामध्ये विशेष प्राविण्य मिळवित योगशिक्षक म्हणून आपल्या समवयस्क किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यास सुरुवात केली. तिच्या या विशेष कार्यासाठी तिला ‘यंगेस्ट ट्रेनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.