काय म्हणता, बैलाने मगरीच्या हल्ल्यात मालकाला वाचविले
कोल्हापूर जिल्ह्याच्या सातवे येथील वारणा नदीच्या काठावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महेश सर्जेराव काटे यांच्यावर मगरीने हल्ला केला. मात्र या हल्ल्यातून महेश यांच्या बैलानेच त्यांचे प्राण वाचवले.
या घटनेमध्ये दुपारच्या वेळी महेश बैलांना घेऊन नदीकडे गेले होते. त्यावेळी पाण्यात उतरलेल्या महेश यांच्या पायाला मगरीने पकडले. मगरीचा चाव्यातून महेश यांचा पाय निघत नव्हता. त्याच वेळी बैलाचा कासरा महेश यांच्या हातात होता.
बैलाने नदीच्या बाहेर ओढल्यामुळे महेश यांचा पाय मगरीच्या तावडीतून सुटला. बाहेर आल्यानंतर महेश यांनी आरडाओरड केली. त्यावेळी त्याठिकाणी इतर शेतकरी गोळा झाले. त्यानंतर महेश यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.