मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:37 IST)

कोसळधार सुरूच ; जळगाव जिल्ह्याला या तारखांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

मागील काही दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.आज 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरसाठी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
दरम्यान, ठराविक जिल्हे वगळता राज्यात मुसळधार पाऊस होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगाल परिसरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर या दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.
 
मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी २० ते २५ मिनिट जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहे. मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने जिल्ह्यावासीयांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाणीसाठा देखील १०० टक्के भरला असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
 
उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.त्यानतंर राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे.तर विकेंडला पुन्हा राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे.
 
यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. परतीचा पाऊस ऐनवेळी दगा देत असल्याने दरवर्षी पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे. खरंतर, यंदा राज्यात परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होणार असून महाराष्ट्रातही हा पाऊस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.