शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (09:24 IST)

दामदुप्पटच्या आमिषाने तब्ब्ल 300 कोटींचा गंडा!

कोल्हापूरमधील दाभोळकर कॉर्नर परिसरातील अयोध्या टॉवरमध्ये दुकानदारी थाटलेल्या सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने 45 दिवसांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने साडेचार हजारांवर गुंतवणूकदारांना सुमारे 300 कोटींचा गंडा घातला आहे. दीड वर्षापासून फरार असलेला कंपनीचा म्होरक्या अक्षय अनिल कांबळे (वय 30, रा. सादळे, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने शनिवारी जेरबंद केले.
 
याप्रकरणी मुख्य संशयित कांबळेसह त्याची पत्नी, भाऊ, आई, वडील, नातेवाईक व साथीदारांविरुद्ध शाहूपुरी, गोकुळ शिरगाव, मुरगूड, मिरज (जि. सांगली) पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. अटक टाळण्यासाठी त्याने कोडोली पोलिस ठाण्यात स्वत:च्या अपहरणाची दि. 31 जानेवारी 2024 मध्ये फिर्यादही दाखल केली होती. दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई, कर्नाटक व गोव्यात म्होरक्यासह त्याच्या साथीदारांनी फसवणूक केली असल्याचा संशय स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी व्यक्त केला.
 
पोलिसांना चकवा देत अक्षय कांबळे व त्याचे साथीदार 2022 पासून फरार होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शाहूपुरी पोलिसांनी सादळे येथील त्याच्या घरावर वारंवार छापे टाकून झडती घेतली; मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित पसार होत. त्याच्या कृत्यास घरातील मंडळी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करीत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचेही कळमकर यांनी सांगितले.
 
कोल्हापुरातील सर्वाधिक मोबादला देणारी आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कंपनी, असा गवगवा अक्षय कांबळे याने केला होता. घसघशीत कमिशनवर एजंटांची साखळी नियुक्त करून गुंतवणूक करण्यास व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना प्रवृत्त करण्यात आले होते. सामान्य महिलांनाही आमिष दाखवून त्याच्याकडून रकमा वसूल करण्यात आल्या होत्या.
 
कार्यालयाला टाळे...
गुंतवणुकीवर 45 दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधीच्या रकमा गोळ्या केल्या आहेत. मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी तगादा लावताच संशयितांनी दाभोळकर कॉर्नर, अयोध्या टॉवरमधील ग्राऊंड फ्लोअरमधील कार्यालयाला टाळे टोकून धूम ठोकली होती.

Edited By - Ratnadeep Ranshoor