शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (15:42 IST)

खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत खडकवासलातून २२ हजार ८८० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, पण आता 27 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळशी धरणातूनही 10 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. परिणामी, नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण देखील 100% भरले आहे. मावळातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही पूल पाण्याखाली गेल्याने येथील काही गावांचा जनसंपर्क तुटल्याची माहिती आहे. तर, लोणावळ्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभरात 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवनाधरण क्षेत्रात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून सकाळी 7 वाजता 10 हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडण्यात येत होते. सकाळी 8 वाजता त्यात वाढ करुन 15 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.