'यांना' संपूर्ण फी माफ होणार, सरकारचा निर्णय
राज्यातील दुष्काळ भागातील १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. ही प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी असा निर्णय शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा शासन निर्णय ही जारी झाला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फी च्या प्रतीपुर्तीचा प्रश्न आला असताना त्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना अशी बाब निदर्शनास आली की, दुष्काळी भागातील १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी ची प्रतिपूर्ती करताना परीक्षा फी माफ केली जाते मात्र त्या मध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जाते त्याच वेळी त्यांनी हे शुल्क सुद्धा माफ करून पूर्ण फी ची प्रतिपूर्ती करण्यात येईल असे शासनातर्फे सभागृहात जाहीर केले होते. त्यानुसार तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे.