सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून संमेलनासाठी गर्दी जमविण्याचा शासनाचा प्रयत्न
अमळनेर : येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांसमोर गर्दी जमविण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे निवडणुकीचे काम आहे, असे आदेश देवून बीएलओ, महसूल, न.पा.चे कर्मचारी, खासगी शाळेचे कर्मचारी यांना सक्तीने संमेलनस्थळी उपस्थित ठेवून गर्दी जमविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कर्मचाऱ्यांना सक्ती न करता त्यांना मनापासून वाटेल त्या ठिकाणी जाऊन साहित्य संमेलनाचा आनंद घेण्याची मुभा द्यावी, असेही आवाहन विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने केले आहे. संमेलनासाठी गर्दी जमविण्याच्या उद्देशाने विविध शाळेतील शिक्षकांना गाड्या पाठवून विद्यार्थी आणण्याची सक्ती करणे, नगरपरिषद सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचारी, महसूल व विविध सरकारी कर्मचाऱ्यांना उपस्थितीची आदेश देवून तंबी देणे या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग असून हे संमेलन राज्यकर्त्यांनी सरकारद्वारे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा भाग झालेला असल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे.
विशेषतः याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राजकारणी लोकांच्या संमेलनाला जाण्याऐवजी विद्रोही साहित्य संमेलनात येणाऱ्या दर्जेदार साहित्यिकांना ऐकायला जाण्याची इच्छा अधिक असल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत प्रशासनाने थोडा खुला दृष्टिकोन घेत विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध सरकारी कर्मचाऱ्यांना सक्ती न करता त्यांना मनापासून वाटेल त्या ठिकाणी जाऊन साहित्य संमेलनाचा आनंद घेण्याची मुभा द्यावी, असे आवाहन विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने केले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor