1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:58 IST)

तरुणीची मान बिबट्याच्या जबड्यात होती, तिने बिबट्याच्या डोक्यावर कळशीने वार केले, धाडसाची कमाल

The leopard's head was broken for release by young girl in pusad
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे घडलेल्या एक थरारक घटनेत तरुणीच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. वृषाली नावाच्या या धाडसी तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने बिबट्याच्या जबड्यातून स्वत:ची मान सोडवून कमाल धाडस दाखवलं.
 
नेमकं काय घडलं?
वृषाली नीळकंठराव ठाकरे करंजखेड येथील रहिवासी आहे. वृषाली फार्मसीची विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सोमवारी वृषाली आईसोबत आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. दरम्यान पिण्याचं पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली. कळशी भरून पाणी घेऊन परत येत असताना पाठीमागून बिबट्याने अचानक वृषालीवर हल्ला केला.
 
बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आत वृषालीची मान बिबट्याच्या जबड्यात गेली. मात्र बिबट्यासोबत झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवत हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर अनेक वार केले. एका पाठोपाठ दणके डोक्यावर बसल्यानंतर बिबट्या भांबावून गेला आणि काही सेकंदानंतर बिबट्याने माघार घेतली. बिबट्याने वृषालीची मान जबड्यातून सोडली आणि नंतर जंगलाच्या दिशेनं पोबारा केला.
 
या झटापटीत वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या असून पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही घटना लक्षात येताच तिला लगेच पुसद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तरुणीनं धाडस दाखवल्याने तिचा जीव वाचला अशात तिच्या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.