बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे
शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी माहिती हाती येत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हातून बीकेसीतील आणखी एक मैदान गेले आहे. ठाकरे गटाने अर्ज केलेले दुसरे मैदान कॉलिन्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी मैदान हवे म्हणून अर्ज करण्याच्या एक महिना आधीच या कंपनीने अर्ज केला होता. यामुळे या कंपनीला हे मैदान देण्यात आले आहे.
या मैदानावर ही कंपनी मोठे प्रदर्शन भरविणार आहे. यामुळे आता ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान शोधावे लागणार आहे. आणखी कोणती मैदाने मिळू शकतात, या शोधात आता शिवसेना नेते आहेत.
शिवसेनेच्या कामगार सेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण एका कंपनीकडून याआधीच कार्यक्रमासाठी ग्राऊंड आरक्षित केलेलं असल्यानं ठाकरेंना परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसीमध्ये दोन मैदानं आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.