हत्तीरोगाची रुग्णसंख्या घटली
Elephant disease patientsपोलिओ प्रमाणेच देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केला असून याची दखल घेत महाराष्ट्रात आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून हत्तीरोग प्रभावित १८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेमुळे हत्तीरोग व अंडवृद्धीच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षात अंडवृद्धी रुग्णांची संख्या ११ हजार ९२९ वरून सात हजार २५६ एवढी झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हत्तीरोग मुक्तीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
भारतात हत्तीरोगाचे मोठे आव्हान असून २१ राज्यांमधील २५६ जिल्ह्य़ांमध्ये या रोगाची व्याप्ती आहे. डासांच्या माध्यमातून शरीरात परोपजीवी जंतूंची निर्मिती होऊन हात व पाय सुजतात. महाराष्ट्रातही नागपूर, गडचिरोली, चंद्रपूरसह १८ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी नोव्हेंबर व फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यात व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. तसेच यात इव्हरमेकटिन, डायइथिल कार्बाझाईन व अल्बेंडोझोल (आयडीए) ही तीन परिणामकारक औषधे देण्यात येणार आहेत.
राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी २००४ पासून वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या असल्या तरी यात दोन प्रकारची औषधे देण्यात येत होती. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार तीन औषधांचे डोस देण्यात येणार आहे. यापूर्वी गडचिरोलीत आयडीएचा प्रयोग करण्यात आला होता.