गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (15:08 IST)

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

The power to cultivate goodwill in Marathi journalism - Chief Minister Uddhav Thackeray
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. आपल्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला. आज  पर्यावरणीय बदल आणि मानव, जीवमात्रांचे आरोग्य, त्यांचे अस्तित्व अशी आव्हाने उभी राहू लागली आहेत. या नव्या संदर्भाने माध्यमांची भूमिका, पत्रकारिता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. पण पत्रकारितेच्या मूल्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही, असा धडाच आचार्य बाळशास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिला आहे. हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे. हा बाणेदारपणा जागवणे हेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आहे. त्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींना मराठी पत्रकार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.