गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (16:23 IST)

परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

prambir singh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन एकनाथ शिंदे सरकारने मागे घेतलं आहे. महाराष्ट्र सरकारचे जॉईंट सेक्रेटरी वेंकटेश भट यांच्या सहीने यासंदर्भातील आदेश आज (12 मे) काढण्यात आला.
परमबीर सिंह यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेत असून हे प्रकरण आता मिटलं आहे, असं या आदेशात म्हटलं आहे.

फरार घोषित केलं होतं
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या प्रकरणात परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं होतं.
 
पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. आता यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं.
 
परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार असून 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळेल, असा त्याचा अर्थ होता.
 
सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता.
 
सचिन वाझे प्रकरणी त्यांनी आरोप केल्यानंतर काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी वैद्यकीय सुटी घेतली. तेव्हापासून ते गायब आहेत असं बोललं जाऊ लागलं. कोर्टात परमबीर सिंग हजर राहत नव्हते. त्याचबरोबर त्यांना बजावण्यात आलेल्या समन्सना उत्तर देत नव्हते. ते कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही.
 
याचसाठी परमबीर सिंग यांना फरार घोषीत करण्याबाबत गुन्हे शाखेकडून कोर्टात मागणी करण्यात आली. त्यावर सुनावणी सुरू होती.
 
परमबीर सिंग कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही, वारंवार समन्स बजावून ते चौकशीला हजर राहत नाहीत, त्यांच्या कोणत्याही पत्यावर ते उपलब्ध नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांच्या बाजूने निर्णय दिला.
 
आता परमबीर सिंग यांना फरार घोषीत करून पुढील तपास त्या दिशेने होईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं.
 
पण अखेरीस आता परमबीर सिंह यांचं निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केलं आहे. या प्रकरणी राजकीय प्रतिक्रिया काय येतात, ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
 
परमबीर सिंह यांचा प्रवास
पोलीस आयुक्त परमबीर सिंह 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. मूळचे हरियाणाचे असलेल्या परमबीर सिंह यांचं शिक्षण दिल्लीत झालं.
 
यूपीएससी परिक्षेत पास झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांची निवड IRS कॅडरमध्ये झाली होती. पण, त्यांनी पुन्हा परिक्षा दिली आणि IPS हे पद मिळवलं.
 
परमबीर सिंह यांच्याबाबत माहिती देताना, त्यांना जवळून ओळखणारे आणि त्यांच्या कामाचं निरीक्षण करणारे पत्रकार धर्मेश ठक्कर सांगतात, "परमबीर सिंह यांनी त्यांची कारकीर्द मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासोबत रायगडमधून सुरू केली. प्रोबेशनरी अधिकारी म्हणून त्यांनी मारिया यांच्या हाताखाली पहिलं काम सुरू केल. पण, परमबीर सिंह खऱ्या अर्थाने नावारूपाला आले त्यांची मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर."
 
1990 च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डने आपली पाळंमुळं रोवण्यास सुरूवात केली. दाऊद, अरूण गवळी यांसारखे डॉन मुंबईवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी भंडारा, चंद्रपूर सारख्या ठिकाणी काम केलेल्या परमबीर सिंह यांची बदली मुंबईत करण्यात आली.
"मुंबईतील झोन-2 त्यावेळी खूप हॉट झोन होता. गवळी गँगची मोठी दहशत होती. परमबीर यांनी गवळी गॅंगवर लक्ष केंद्रीत केलं. गवळी गॅंगचा कणा मोडण्यात परमबीर आघाडीवर होते. दिवंगत एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत त्यांनी टीम तयार केली आणि गवळी गॅंगच्या अनेकांचा एन्काउंटर केला," असं धर्मेंश ठक्कर म्हणतात.
 
पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई आणि पोलीस उपायुक्त गुन्हे म्हणून काम केल्यानंतर 2002 मध्ये त्यांची ठाणे ग्रामीणला बदली झाली. त्यानंतर ठाणे शहरात त्यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे म्हणून काम केलं.
 
साध्वी प्रज्ञा सिंहचे आरोप
2006 मध्ये परमबीर सिंह यांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात (ATS)नियुक्ती झाली. याकाळात त्यांनी दहशतवादाच्या अनेक प्रकरणांची चौकशी केली. पण 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना ATSने मालेगाव ब्लास्ट प्रकरणी अटक केली. साध्वी प्रज्ञा यांनी परमबीर सिंह यांच्यावर पोलीस कस्टडीत असताना मारहाण केल्याचा आरोप केला.
 
हे आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळले होते.
26/11 चा मुंबई हल्ला आणि घणसोलीची दंगल
मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यावेळी सिंह आपल्या टीमसोबत ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलमध्ये गेले होते. 26/11 च्या हल्लादरम्यान सिंह यांच्या पथकानेच पाकिस्तानी अतिरेक्यांचे कॉल ट्रेस केले.
 
नवी मुंबईतील घणसोली भागात सुरू असलेली दंगल आटोक्यात येत नव्हती. परमबीर त्यावेळी राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपमहानिरीक्षक होते. त्यांना दंगलीवर काबू करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. परमबीर सिंह यांच्यावर या दंगलीत हल्ला करण्यात आला होता.
 
ठाणे पोलीस आयुक्त
कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक पदाची धुरा साभाळल्यानंतर 2016च्या सुमारास परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी बदली झाली. ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या टीमने मीरारोड भागात फेक कॉलसेंटर छापा मारला होता.
 
भारतातील या सर्वांत मोठ्या फेक कॉलसेंटरच्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतात आली होती.
 
दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला परमबीर हे ठाणे पोलीस आयुक्त असताना खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
एल्गार परिषदचं प्रकरण
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था असताना परमबीर सिंह यांनी पुणे पोलिसांनी एल्गार परिषद कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती.
 
यात त्यांनी पोलिसांकडे असलेले पुरावे समोर ठेवले. त्यानंतर सिंह यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
 
फेब्रुवारी 2020मध्ये परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
'फिटनेस फ्रिक' म्हणून ओळख
परमबीर सिंह याचं फिटनेसवर काटेकोरपणे लक्ष असतं. योग्य आहार, व्यायाम यावर त्यांचा जास्त जोर असतो, असं त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी सांगतात.
 





Published By- Priya Dixit