रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित, नागपूर जिल्हाही पहिला

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता अहवालात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. तर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या अहवालानुसार 2017 च्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे .
 
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील 176 नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र, धरणं कुपनलिका, विहिरी ईत्यादी मिळून 228 पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रांच्या आणि 66 भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर केला आहे. 
 
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बहुतेक नद्या आणि जलस्त्रोत प्रदूषित आढळले आहेत. सोबतच अहमदनगर, जळगाव, पुणे, अकोला, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही जलस्रोत प्रदूषित आढळले.
 
ठाणे जिल्ह्यातील काही स्रोत अत्यंत प्रदूषित, पिण्यास अयोग्य श्रेणीत तर अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, रायगड येथील भूजल स्त्रोत प्रदुषित आढळले आहेत. 66 नमुन्यांपैकी 36 नमुने प्रदूषित आढळले. त्यात नागपूर जिल्ह्यात 12, तर 7 नमुने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या 2019 च्या पाहणीनुसार, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक नद्या प्रदूषित आहेत. 2018 मध्ये 53 नद्या प्रदूषित होत्या. तर 2019 वर्षात 45 नद्या प्रदूषित असल्याचं आढळंल.
 
या प्रदूषित नद्यांमध्ये गोदावरी, मुठा, मोरणा, वैनगंगा, भीमा, कालू, कुंड लिका, मुठा, इंद्रावती, कण्हान, मुठा, मुठा-मुळा, पावणा, पेढी, पूर्णा, वर्धा, दारणा, कोलार, कृष्णा, निरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, रान गवली, तापी, वेल, अंबा, भातसा, बिंदुसार, चंद्रभागा, घोड, कोयना, मांझरा, पेल्हार, सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा, वेना,पंचगंगा, उरमोडी, वाशिष्ठी यांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्र विभागवार प्रदूषण
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018-19 ह्या वर्षात केलेल्या निरीक्षणात भूजल आणि नद्या प्रदूषणात नागपूर सर्वाधिक प्रदूषित आहे.
 
1) नागपूर येथे 14 नमुन्यातील 12 केंद्रातील नमुने प्रदूषित
2) कोल्हापूर केंद्रावर 15 पैकी 10 नमुने प्रदूषित
3) पुणे केंद्रावर 6 पैकी 3 नमुने प्रदूषित
4)ठाणे केंद्रावर 5 पैकी 3 नमुने प्रदूषित
5)रायगड केंद्रावर 3 पैकी 1 नमुना प्रदूषित
6) चंद्रपूर केंद्रावर 2 पैकी 2 नमुने प्रदूषित
7)नाशिक केंद्रावर 7 पैकी 1 नमुना प्रदूषित
8)अमरावती केंद्रावर 3 पैकी 1 नमुना प्रदूषित