शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:07 IST)

ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक, सहा प्रवासी जागीच ठार

बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे. अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने येत होते. दरम्यान, सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जीपला जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक चालक जागीच ठार झाले तर दहा जण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. 

शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एमएच २४ व्ही – ८०६१ क्रमांकाच्या ट्रकने आरजे ११ जीए ९२१० क्रमांकाच्या जीपला जोरात धडक दिली. जीपमधील प्रवासी लातूरचे रहिवारी आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक ) यांचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (०९), श्रुतिका पवार (०६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, आणखी काही जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.