सत्तेचे समीकरणे अनेक मांडत आहेत, मी त्याबाबत काहीही बोलणार नाही - फडणवीस
महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं रोज मांडली जात असून, त्याबद्दल अनेकजण पुढे येवून विधाने करत आहेत, मी मात्र त्याबाबत काहीही बोलणार नाही असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सरकार स्थापने बाबत सत्तेची समीकरणं रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. दिल्लीत आज देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची महत्वाची भेट घेतली आहे. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात विशेष म्हणजे युती शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा २४ ऑक्टोबर रोजी निकाल स्पष्ट झाला. शिवसेनेला ५६, भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत. या सगळ्या सत्ता समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहे. सत्तेत शिवसेनेने अर्धा वाटा मागितला आहे. तर मुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षे वाटून घ्या असं सुचवले आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत अडचणी येत असून, आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सर्व माध्यमांत सुरु आहेत. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे बोलत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे १७० आमदारांचं पाठबळ असल्याचंही सांगितलं.
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.