रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (17:58 IST)

'त्यांनी रात्री माझ्या पतीला उचलून नेलं, मी थंडीत रडत पोलिस स्टेशन गाठलं; पण...'

rape
कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता एका आरोपीला अटक केल्याप्रकरणी सुरत सायबर क्राइम पोलिसांच्या 9 कर्मचार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. गाझियाबादमधील विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांनी दिली आहे.
 
त्याचं झालं असं की, सुरतच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून देवेंद्र गुप्ता नामक व्यक्तीला अटक केली. पण ही अटक करताना सुरत पोलिसांनी स्थानिक पोलिसांची कायदेशीर परवानगी घेतली नाही.
 
यावर आरोपीची पत्नी मोनिका अग्रवाल यांनी सुरतच्या 9 पोलिस कर्मचार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
 
यानंतर न्यायालयाने देखील ही अटक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. त्यानुसार न्यायालयाने सुरत क्राइम ब्रँचच्या पोलिस कर्मचार्‍यांविरुद्ध आयपीसी कलम 452, 323, 363, 342 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
 
आता न्यायालयाच्या आदेशानंतर गाझियाबाद जिल्ह्यातील विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये सुरत पोलिसांविरुद्ध अपहरण तसेच गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
जुन्या गाझियाबाद सेक्टर-9 मध्ये राहणाऱ्या मोनिका अग्रवालने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, "26 डिसेंबर 2022 च्या रात्री 10 वाजता आमच्या विजयनगर येथील घरी सुरतहून काही पोलिस कर्मचारी आले होते. यांमध्ये यूएन महाराज, पृथ्वीराज सिंह बघेल, इंद्रजित सिंग कौशिक आणि सुरत सायबर क्राईममधील इतर पोलीस कर्मचारी (नावं माहित नाहीत) होते. महिला पोलीस अधिकारी न आणता हे पोलिस आमच्या घरात घुसले आणि त्यांनी आमच्याशी असभ्य वर्तन केलं."
 
मोनिकाने पोलिसांवर आरोप करताना म्हटलंय की, त्यांनी माझ्या पतीला पलंगावरून उचलून विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये नेलं. रात्री कडाक्याच्या थंडीत मी रडत रडत विजयनगर पोलिस स्टेशन गाठलं. तिथे पोलिस माझ्या पतीला मारहाण करत होते. ते बघून मी खूप अस्वस्थ झाले.
 
तिने दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की, आपल्या पतीला नेमक्या कोणत्या गुन्ह्यासाठी अटक केलीय, त्यासाठी पोलिसांकडे अटक वॉरंट आहे का ? याबद्दल तिने पोलिसांकडे वारंवार विचारणा केली. मात्र पोलिसांनी तिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. शिवाय तिच्या पतीचीही भेट घेऊ दिली नाही.
 
"तक्रारदाराच्या भावाने पहाटे 2 वाजता पोलिस हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांची मदत मागितली. मात्र पोलिस आले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि निघून गेले."
 
तक्रारीत असंही म्हटलंय की, "मोनिका दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये गेली. पण त्यावेळी तिचा पती देवेंद्र गुप्ता तिथे नव्हता."
"तिथं असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तिला उत्तर देताना टाळाटाळ केली. यामुळे ती आणखीनच घाबरली. ती तिथेच बसून राहिली आणि वारंवार आपल्या पतीविषयी चौकशी करू लागली. यावर देवेंद्र गुप्ताला दिल्लीतील वजिराबादला नेण्यात आलं असून, तो संध्याकाळपर्यंत परत येईल असं एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला सांगितलं."
 
तक्रारीत पुढे म्हटलंय की, "संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी देवेंद्र घरी न आल्याने मोनिकाच्या भावाने सव्वा पाच वाजता पोलिस हेल्पलाइनवर फोन केला आणि देवेंद्र गुप्ता घरी आले नसल्याचं सांगितलं."
 
"मोनिकाच्या भावाने रात्री पुन्हा एकदा पोलिसांशी संपर्क केला. कायदेशीर मदत मिळावी म्हणून त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र पोलिसांकडून मदत मिळाली नाही."
 
"आपला पती पोलिसांच्या कस्टडीत असल्याचं पोलिसांनी लेखी लिहून द्यावं अशी मागणी मोनिकाने केली. पण पोलिस यासाठी तयार नव्हते."
 
पती मानसिक रुग्ण असल्याचंही मोनिकाने पोलिसांना सांगून बघितलं. आपल्या पतीला मायग्रेनचा त्रास असून त्याला वेळेत औषधे दिली नाहीत तर काहीतरी बरंवाईट घडू शकतं हे देखील तिने पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी तरीही त्याला औषध देऊ दिलं नाही."
 
अखेर न्यायालयाचा आधार घ्यावा लागला...
यानंतर मोनिका अग्रवालने पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त, आयजी, मानवाधिकार आयोग दिल्ली, महिला आयोग आदींकडे स्पीड पोस्ट करून तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने ती न्यायालयात गेली.
 
न्यायालयाने विजयनगर पोलीस स्टेशनला नोटीस बजावली. त्यानंतर, 4 जानेवारी 2023 रोजी, विजयनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितलं की, सुरतहून आलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनला न
 
कळवता मनमानी पद्धतीने देवेंद्र गुप्ताला अटक करून गुजरातला नेलं. त्यांनी अटकेची प्रक्रिया योग्य प्रकारे केलीच नाही.
 
प्रभारी निरीक्षक पुढे म्हणाले की, सुरत पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने कट रचून आरोपीला सुरतला नेलं. त्यांनी विजयनगर पोलिस स्टेशनची देखील फसवणूक केली.
विजयनगर पोलीस स्टेशनने आपली बाजू न्यायालयात मांडल्यावर मोनिका अग्रवालने सुरत पोलिसांची तक्रार देण्यासाठी विजयनगर पोलीस स्टेशन गाठलं. पण विजयनगर पोलीस स्टेशनने तिची तक्रार घ्यायला नकार दिला.
 
शेवटी मोनिका अग्रवालने एसीपी, डीसीपी तसेच उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आपली तक्रार स्पीड पोस्टने पाठवली.
 
तिने पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि 26 फेब्रुवारी रोजी विजयनगर पोलिस स्टेशनने सुरतच्या सायबर क्राईमच्या पोलिसांविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदवून घेतली.
 
कायदेशीर प्रक्रिया न करताच आरोपीला अटक केली..
गाझियाबादचे डीसीपी निपुण अग्रवाल यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये सुरत पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
दुसऱ्या बाजूला मोनिका अग्रवालचे वकील भवनीश गोला यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मोनिका अग्रवालच्या पतीला सुरतला नेण्यात आलं."
 
"चार दिवस अटकेत ठेवूनही अटक झाली नसल्याचं दाखवलं. शिवाय कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता देवेंद्र गुप्ता यांना सुरतला नेण्यात आलं. न्यायालयाने गुजरात पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोनिका अग्रवाल यांनी विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये सुरतच्या सायबर क्राईम पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या पतीला जामीन मिळाला असून ते आता गाझियाबादला आले आहेत."
 
देवेंद्र गुप्ता यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार..
सुरत सायबर क्राईमचे एसीपी वाय ए गोहिल यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "तक्रारदार मोनिका अग्रवाल यांचे पती देवेंद्र गुप्ता यांच्याविरोधात 6.50 लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली. ट्रांझिट प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सुरत पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "आरोपी देवेंद्र गुप्ताला करण्यात आलेली अटक कायदेशीरच होती. आरोपीला सुरतच्या न्यायालयातही हजर करण्यात आलं होतं. पण सध्या त्याला जामिनावर सोडून देण्यात आलंय. आम्ही या प्रकरणातील कागदपत्रं न्यायालयात सादर करणार आहोत."
 
Published By- Priya Dixit