हा आहे खरा सामान्य जनतेतील आमदार, राज्यातील या आमदाराला घर नाही ना संपत्ती
राज्यातील विधानसभा निवडणुक संपली आहे. आता युतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरु असून, राज्यातील वातावरण तापलेले आहे. मात्र हे सर्व एका बाजूला सुरु असतांना सोशल मिडियावर चर्चा आहे डहाणूमधील नवनिर्वाचित एका आमदाराची. चर्चेचे कारण असे की. डहाणूचे नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले हे यंदा निवडून आलेले सर्वात गरीब आमदार तर आहेतच मात्र त्यांच्या कडे स्वतःचे घर सुद्धा नाही. त्यांनी आपले जीवनच समाज कार्याला वाहून घेतले आहे. पालघरमधील डहाणू मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडून हे निकोले यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला असून, विरोधकांनी पैसे वाटले तरी मला विश्वास होता की मी जिंकेन असे मत विजयानंतर निकोले यांनी व्यक्त केले.
निकोले यांची एकूण संपत्ती ५१ हजार ८२ रुपये इतकी तर आहेच, सोबतच निकोलेंच्या नावावर स्वत:चे घरही नाही. ते डहाणूमधील वाकी येथे भाड्याच्या घरामध्ये राहतात. त्यांची पत्नी बबिता या आश्रम शाळेमध्ये सेविका असून, त्यांचे महिन्याचे वेतन सहा हजार रुपये आहे. निकोले यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याकडे ३० हजार २४० रुपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले आहे. पत्नीकडे पाच हजारांची रोख रक्कम असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आपण पूर्णवेळ पक्षाचे कार्यकर्ते असून आपल्याला महिन्याला पाच हजार रुपये वेतन मिळत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या निकोले हे सोशल मिडीयावर हिरो ठरले आहेत. त्यांना अनेकांनी सामान्य जनतेतील आमदार असे देखील म्हटले आहे.