बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2023 (09:01 IST)

शिवसेनेचे ते मोर्चे, ज्यांनी सत्ताधाऱ्यांसह मित्रपक्षालाही धडकी भरली

aditya thackeray
मयुरेश कोण्णूर
twitter
Shiv Sena which had struck a chord आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोर्चा निघतो आहे. 2010 मध्ये आदित्य यांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत राजकारण प्रवेश. तेव्हापासून त्यांच्यावर युवासेना प्रमुख, नंतर आमदार आणि मग कॅबिनेट मंत्री अशा चढत्या जबाबदाऱ्या आल्या. पण तरीही त्यांचं राजकारण वडील उद्धव ठाकरे यांच्या सावलीतच सुरु आहे.
 
कदाचित यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच आदित्य यांचा चेहरा पुढे करुन, त्यांच्या नेतृत्वात शिवसेना लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा हा मुंबईतला पहिलाच असा मोठा मोर्चा असणार आहे.
 
2004 मध्ये पहिल्यांदा उद्धव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढणारी आणि त्यानंतरही सतत मुंबईची सत्ता राखणारी सेना, यंदाची निवडणूक आदित्य यांच्या नेतृत्वात लढणार असं दिसतं आहे आणि हा मोर्चा त्याचीच सुरुवात असेल.
 
शिवसेनेनं हा मोर्चा शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काढला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची ठरलेली वेळ जाऊन आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि तिथे सध्या प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त पूर्ण काम पाहत आहेत.
 
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे की लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत पालिकेच्या पैशाची उधळपट्टी झाली आहे.
 
शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला. स्थापनेपासून सेनेनं अनेक आंदोलनं, बंद आणि मोर्चे शिवसेनेनं अनेक मागण्यांसाठी केले. सेनेच्या वाढत गेलेल्या आक्रमक, राड्याच्या राजकारणामुळे त्यांच्या आंदोलनांची चर्चाही होत गेली. 'सेना स्टाईल' अशी तयार होत गेली आणि त्याची कुठे दहशत तर कुठे अप्रूप वाटत राहिलं.
 
शिवसेनेच्या इतिहासात अशा मोर्चांचंही महत्व आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वातही असे काही मोर्चे निघाले. त्यानं शिवसेनेची मुळं मुंबईत रुजली. त्यातून सेनेला पाठिंबा किती आहे हेही दिसलं.
 
त्यामुळे आज शिवसेनेच्या आयुष्यात एक ऐतिहासिक दुफळी निर्माण झालेली असतांना, मुंबईतल्या तिच्या अस्तित्वाचीच लढाई सुरु असतांना, जेव्हा आदित्य ठाकरे त्यांच्या पहिला मोर्चा मुंबई महापालिकेवर काढत आहेत, तेव्हा सेनेच्या इतिहासातल्या काही मोर्चांची नोंद करणं आवश्यक आहे.
 
शिवसेनेचा पहिला मोर्चा
शिवसेनेचा पहिला मोर्चा हा या पक्षाच्या स्थापनेनंतर वर्षभरातच निघाला होता. सेनेची स्थापना ही भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर झाली होती. मराठी तरुणांना इथल्या नोकऱ्यांमध्ये, सरकारी संधींमध्ये डावललं जातं अशी भावना मराठी भाषिकांमध्ये, मुख्यत: मुंबईमध्ये, बळावलेली होती. पण त्याविषयी कोणीही आवाज उठवत नव्हतं.
 
बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रांमधून या भावनेला वाट करुन द्यायला सुरुवात केली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि पुढे हे सगळं शिवसेनेच्या स्थापनेपर्यंत जाऊन पोहोचलं.
 
शिवसेनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली, मात्र त्याची सरकारला आणि लोकांनाही जाणीव करुन देण्यासाठी कार्यक्रमही आवश्यक असतो. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा पहिला मोर्चा 21 जुलै 1967 मध्ये मुंबईत विधिमंडळावर काढला गेला.
 
हा मोर्चा आझाद मैदानापासून सुरु झाला आणि काळा घोडा चौकापर्यंत गेला. मोठी गर्दी या मोर्चाला झाली होती. ठाकरेंसोबत तेव्हा मनोहर जोशी, दत्ताजी साळवी असे नंतर मोठे झालेले सेनेचे सहकारी होते. पश्चिम रेल्वेच्या पाट्या मराठी असाव्यात या मागणीसह 25 इतर मागण्यांची निवेदन ठाकरेंनी तत्कालीन सरकारला दिले आणि त्या पूर्ण करण्याची डेडलाईनंही दिली.
 
शिवसेनेच्या या पहिल्या मोर्चात केल्या गेलेल्या काही मागण्या होत्या अशा होत्या:
 
1. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणी असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्डवर तो किती काळ महाराष्ट्राचा रहिवासी आहे, मराठी भाषा येते किंवा नाही अशा गोष्टींची नोंद असायला हवी.
 
2. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र यांच्याकरता स्वतंत्र विद्यापीठे निर्माण व्हावीत.
 
3. इतर राज्यांप्रमाणे या राज्यातही सर्व ठिकाणी 80 टक्के नोकर्‍या मराठी माणसांसाठी राखून ठेवल्या पाहिजेत, असे धोरण असावे.
 
4. मराठी भाषा उत्तम लिहिता बोलता येत असणार्‍यांनाच सरकारी-निमसरकारी कचेर्‍यांत आणि इतरत्र नोकरीस ठेवावे.
 
मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्या मुद्द्यांवर शिवसेनेनं पुढे जे आंदोलन आणि राजकारण उभं केलं, शिवसेनेची पक्ष म्हणून ज्या प्रश्नांवर वाढ झाली, त्याचं मूळ या मोर्चांच्या मागण्यांमध्ये दिसतं. या मोर्चाची मोठी चर्चा झाली.
 
विधानसभेतही त्यावरुन प्रश्न विचारले गेले. या मोर्चात शिवसेनेच्या मागण्यांविरुद्ध भूमिका घेणा-या काही वर्तमानपत्रांची होळी करण्यात आली असंही लिहून ठेवण्यात आलं आहे.
 
सेनेच्या या भूमिपुत्रांसाठीच्या पहिल्या मोर्चानं अधिक मराठी तरुण या पक्षाकडे आकर्षित होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हा मोर्चा सेनेच्या वाटचालीत महत्वाचा ठरतो.
 
शिवसेनेचा 'एअर इंडिया'वरचा मोर्चा
एअर इंडिया आणि मुंबईकरांच्या आठवणींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाची एक महत्त्वाची आठवण आहे.
 
नोकरभरतीमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो, असं सांगत शिवसेनेने एअर इंडिया, ओबेरॉय शेरेटन हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फूड कार्पोरेशन मोर्चे काढायला सुरुवात केली होती. त्याकाळी या आस्थापनांचे प्रमुख अमराठी असायचे.
 
एअर इंडियाच्या मुख्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला होता. साल १९७२ होतं. या मोर्चाचं नेतृत्व खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं. या मोर्चात एअर इंडियाचे चीफ पर्सनेल ऑफिसर नंदा यांना मारहाण झाली.
 
शिवसेनेच्या इतिहासावर 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर एअर इंडियावरील मोर्चाबाबत लिहितात, 'कोणाला अटक झाल्यास एअर इंडियाच्या बाहेर जमलेले शिवसैनिक चिडतील, असा इशारा ठाकरे यांनी मोर्चाच्या वेळी दिला होता.'
 
या मोर्चानंतर पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नाही, असं सांगून हा मोर्चा शिवसेनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता, असं अकोलकर लिहितात.
 
जेव्हा मोरारजी देसाईंची गाडी शिवसैनिकांनी अडवली
शिवसेनेच्या इतिहासातलं बहुचर्चित मोर्चा अथवा आंदोलन म्हणजे 1969 मध्ये तेव्हा उपपंतप्रधान असणा-या मोरारजी देसाईंची गाडी अडवली गेली, राडा झाला आणि त्यात अनेक शिवसैनिकांचं रक्त सांडलं.
 
विषय होता महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा. शिवसेनेचा जन्मच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून झाला होता. त्यामुळे तेव्हापासून सीमावादावर ठाकरेंची आक्रमक भूमिका होती.
 
1969 उजाडेपर्यंत सीमाप्रश्न महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरही बराच काळ रेंगाळला होता. तेव्हा 7 फेब्रुवारी 1969 रोजी सत्याग्रह आंदोलन करुन उपपंतप्रधान मोरारजी देसाईंना निवेदन देण्याचं ठाकरे यांनी ठरवलं.
 
माहिमजवळ सेनेचा मोर्चा निघेल, सत्याग्रह केला जाईल आणि विमानतळावरुन देसाईंची गाडी घराकडे जात असतांना त्यांना मध्ये थांबून निवेदन दिलं जाईल, असं ठरलं होतं. पण प्रत्यक्षात उलटं झालं. देसाई यांनी निवेदन घेण्यास नकार दिला असं सांगितलं जातं. मग शिवसैनिकांचा क्षोभ झाला. मोर्चाला हिंसक वळण लागलं.
 
ताफ्यावर दगडफेक झाली. पोलिसांनी प्रतिकार केला. गोळीबार झाला. त्यात 59 जणांचे जीव गेले. शिवसेनेची अनेक आंदोलनं नंतरही झाली. पण हे आंदोलन सर्वाधिक निर्णायक ठरलं.
 
याच वेळेस बाळासाहेबांना त्यांच्या कारकीर्दीत एकमेव वेळेस अटक करण्यात आली. इतरही नेत्यांची धरपकड झाली. पण ही अटक होताच दंगल अधिक भडकली. विशेषत: दादर परिसरात त्याचे प्रतिसाद भयंकर उमटले.
 
या घटनेनंतर शिवसेनेचं उग्र रुप सर्वांच्या समोर आलं. ठाकरेंची एक जरब राजकारणात, त्यातही मुंबईच्या, निर्माण झाली. जवळपास आठवडाभर पुढे मुंबईत जाळपोळ, हिंसा सुरु होती. शेवटी तत्कालीन वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांना येरवडा तुरुंगातून शांततेचं आवाहन करायला सांगितलं.
 
उद्धव ठाकरेंचा शेतकरी विम्यासाठी मोर्चा
उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं आली तोपर्यंत शिवसेना हा केवळ रस्त्यावरच्या आंदोलनांचा आणि मोर्चांचा पक्ष न राहता तो सत्तेत बराच काळ राहिलेला पक्ष झाला होता. त्यामुळे सेनेची स्थानिक आंदोलनं सुरु राहिली तरीही सुरुवातीच्या टप्प्यातले मोर्चे, बंद यांचं प्रमाण कमी दिसतं.
 
पण तरीही 2019 मध्ये उद्धव यांनी स्वत:च्याच सरकारविरुद्ध मुंबईत काढलेला एक मोर्चा राजकीयदृष्ट्याही महत्वाचा मानावा लागेल.
 
तो त्यांनी 18 जुलै 2019 रोजी काढला होता. शेतक-यांना झालेल्या नुकसानासाठी त्यांना दिली जाणं अपेक्षित असलेली विम्याची रक्कम कंपन्यांकडून अदा केली गेली नव्हती. त्याचा मोठा रोष शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाला होता.
 
त्यामुद्द्यावर बीकेसी इथं असणा-या विम्या कंपन्यांच्या कार्यलयावर उद्धव यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून त्यांना 15 दिवसांची डेडलाईन शिवसेनेनं दिली. उद्धव यांच्यासोबत तेव्हा आदित्य ठाकरे आणि तेव्हा ठाकरेंसोबतच असलेले एकनाथ शिंदे हेही सहभागी झाले होते.
 
या मोर्चाचं महत्व यासाठी की सेना तेव्हा भाजपासोबत सत्तेत असूनही ठाकरेंनी हा मोर्चा काढला होता. म्हणजे एका प्रकारे हा स्वत:च्या सरकारविरुद्धच मोर्चा होता. या निर्णयात पुढच्या राजकारणाचीही चिन्हं दिसतात.
 
त्यानंतर अवघ्या पाचच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र होते मात्र निकालानंतर उद्धव यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं. त्यामुळेच या मोर्चाची चर्चा झाली कारण युतीत सगळं काही आलबेल नाही हे सा-यांना कळून चुकलं होतं.
 
उद्धव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा मोर्चा
जुलै 2022 मध्ये उद्धव यांचं सरकार पडल्यानंतर मुंबईतच त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा, म्हणजे सेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा एकत्रित मोर्चा निघाला होता. तोही महत्वाचा ठरला जातो, कारण सरकारपश्चात महाविकास आघाडी एकत्र आहे किंवा नाही याबद्दल प्रश्न विचारले जात होते.
 
तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या काही वक्तव्यांमुळं महाराष्ट्रात वादंग उठले होते. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. तीनही पक्षांनी त्यांचं मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
 
उद्धव महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असल्यानं सहाजिक मोर्चाचं नेतृत्व त्यांच्याकडे होते. एका प्रकारे शिवसेना फुटल्यावर हे शिवसेनेचं मुंबईतलं शक्तिप्रदर्शन असं म्हणूनही पाहिलं गेलं.
 
आता आदित्य यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे शिवसेनेचा पहिला मोर्चा मुंबईत निघतो आहे. शिवसेना फुटलेली असतांना रस्त्यावरची ताकद कोणाकडे आहे हे दाखवण्याची ही स्पर्धा आहे.
 
येत्या वर्षभरात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुका या सद्य राजकीय परिस्थिती पाहता इतिहासात ठळकपणे नोंद होतील अशाच असतील. म्हणून त्याअगोदर होणा-या या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष तितक्याच गांभीर्यानं असणार आहे.