शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (19:53 IST)

उद्धव ठाकरेः आदित्य ठाकरेंना मराठी शाळेत घालण्याऐवजी इंग्रजी शाळेत घातलं कारण...

"जास्तीत जास्त भाषा शिकणं हा काय गुन्हा नाही. पण इंग्रजी शाळेमध्ये असावी आणि घरामध्ये मराठीच असावी, अशी सक्त ताकीद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, त्यामुळेच आपण आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना इंग्रजी शाळेत घातलं," असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
 
गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी 'मराठी शाळे'च्या मुद्द्यावर ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी भाषणादरम्यान उत्तर दिलं.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही टीका झाली होती. हे मराठी-मराठी करतात, पण यांची नातवंडं इंग्रजी शाळेत जातात, असं लोक म्हणायचे. पण शिवसेनाप्रमुखांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की इंग्रजी शाळेतमध्ये आणि मराठी घरामध्ये आहे. घरात मॉम-डॅड वगैरे चालणार नाही. घरात आई-बाबा असंच बोललं पाहिजे. आजोबांनासुद्धा आजोबाच बोललं पाहिजे. फार तर फार आजा बोला."
मुख्यमंत्र्यांचे दोन्ही सुपुत्र पर्यावरण आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी इंग्रजी शाळेतच शिक्षण घेतलं आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या माहिम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण झालं. त्यानंतर फोर्ट येथील सेंट झेवियर्स कॉलेज येथून त्यांनी इतिहास या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली. त्यानंतर चर्चगेट येथील किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही मराठीच्या मुद्द्यावरून झाली होती. मराठीचा मुद्दा हाच शिवसेनेच्या राजकारणाचा पाया राहिला आहे.
 
निवडणुकीच्या राजकारणातही शिवसेनेचं लक्ष मराठी मतदारांवर केंद्रीत असतं, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात.
पण ठाकरे भावंडांचं शिक्षण इंग्रजीत झाल्याच्या कारणावरून ठाकरे कुटुंबीयांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून नेहमी होताना दिसतो.
 
याबाबत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "माझी दोन्ही मुलं इंग्रजी बोलतात, ते तुमच्या समोरच आहेत. पण ते हिंदीही बोलतात, मराठीही बोलतात. जास्तीत जास्त भाषा शिकणं हा काय गुन्हा नाही. दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचा नसला तरी आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड आपल्याला असता कामा नये."
 
शिवाय, मराठी भाषेबद्दल खूप बोलता येईल, पण मराठी भाषेत बोला, अशी विनंती मी सर्वांना करेन, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
इतिहास विसरतो त्याला भविष्य नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठी माणूस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचं स्मारकही जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही."

"मुंबईसाठी आजोबा लढले. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम शिवसेनाप्रमुखांनी केलं. आज मुख्यमंत्री म्हणून माझं नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागलं, यापेक्षा माझ्या जीवनाचं दुसरे सार्थक असूच शकत नाही. देशातीलच नाही तर परदेशातील माणसं हे काम पाहायला यावीत. एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावं, हे इथं आल्यानंतर कळलं पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं.
 
जास्त भाषा शिकणं हा गुन्हा नाही
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी. दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करण्याची वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे."
 
"मराठी भाषेत बोला, असं म्हटलं की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही."
 
मराठी भाषा सोपी व्हावी
मराठी भाषा सोपी व्हायला हवी, त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, असं ठाकरे यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण. हे काम सुभाष देसाई यांनी हाती घेतल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांचे खलिते ही सोप्या भाषेत केले होते. राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे त्यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नव्हे तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यांनी हे केलं नसतं तर आपण असतो की नाही, हा भगवा असता की नाही काही कळत नाही."