शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (09:28 IST)

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…

मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्सप्रकरणी राज्यात गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात परस्पर आरोप-प्रत्यारोपाची फेरी झाडत असतात. नुकतंच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर  गंभीर आरोप केले होते. या आरोपाला फडणवीस यांनी उत्तर दिले होते. मलिकांनी लवंगी फटाके फोडले, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या विधानानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काहीजण बॉम्ब फोडणार आहे, असं समजतंय. फोडा काय बॉम्ब फोडायचे आहेत. पण, पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडणार ते सांगा आधी? मी त्याची वाट बघतोय. दिवाळीला राजकीय फटाक्यांची गरज नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
 
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गेल्या दीड वर्षात कोरोना होता. आता जरा शांतता आहे. पण, पाश्चिमात्य देशात तिसरी लाट आली आहे.लस न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच बाहेरच्या व्हेरीयंटची आपल्यालाही भीती आहे.पहिली लाट आली तेव्हा सगळे मिळून ऑक्सिजन, बेड सर्व होते. मात्र, त्यानंतर ते सर्व कमी पडायला लागलं.कोरोनावर अजून औषध नाही. ऑक्सिजनचे सव्वा लाख बेड उपलब्ध आहेत.पण, कोरोनाचा पीक होता त्यावेळी बाहेरून ऑक्सिजन मागवावे लागले होते.आता आपले स्वतःचे ऑक्सिजनचे प्लांट आहेत. कोरोनावर अजून रामबाण औषध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.