शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (11:03 IST)

उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा, अडीच वर्षांत प्रथमच खुल्या मैदानावर सभेचं आयोजन

uddhav thackeray
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (14 मे) मुंबई येथे जाहीर सभा होणार आहे. मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स मैदानावर सायंकाळी 7 वाजता ही सभा होईल.
 
शिवसेनेकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना भावनिक सादही घातली जात आहे.
 
हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, अशा स्वरुपाचं ब्रँडिंग शिवसेनेकडून केलं जात आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापवल्याचं पाहायला मिळालं.
 
त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, विरोधी पक्ष भाजपकडूनही सातत्याने सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. दरम्यान, राज्यातील प्रलंबित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची सूचनाही सुप्रीम कोर्टाने केली आहे.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
 
हिंदुत्वाचा हुंकार
शिवसेनेतर्फे गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली होती.
 
या अभियाना अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं.
बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठिकठिकाणी या सभेचे टीजर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.
 
दरम्यान, या सभेचा टिझर शिवसेनेने रविवारी टि्वटवरून जाहीर केला आहे. अवघ्या १५ सेकंदाच्या या टिझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते.
 
मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत.
 
तर बाळासाहेबांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्त्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
 
अडीच वर्षांत प्रथमच जाहीर सभा
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू झालं होतं.
 
यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह इतर राजकीय जाहीर सभा त्या वर्षात होऊ शकल्या नाहीत. गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेची कोणतीही जाहीर सभा खुल्या मैदानावर झाली नाही.
 
कोव्हिड निर्बंधांमुळे गेल्या वर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावाही नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर न होता षण्मुखानंद सभागृहात झाला होता.
 
त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेची अशा प्रकारची खुल्या मैदानातील जाहीर सभा होणार असल्याने याबाबत उत्सुकता आहे. या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहनही पक्षाकडून करण्यात आलं आहे.