गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (09:00 IST)

अहमदनगर लोक अदालतीमध्ये 17 जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले….!

court
अहमदनगर (Ahmednagar) विविध कारणांमुळे न्यायाप्रविष्ट असलेल्या तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयामध्ये 17720 दाखलपूर्व व 2613 प्रलंबित अशी एकूण 20333 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १७ जोडप्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा फुलविण्यात लोक न्यायालयाला यश आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या सयुंक्त विदयमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात, नुकसान भरपाई, विदयुत प्रकरणे, वित्तीय संस्था कौटुंबिक वादाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात १९ न्यायाधीश पॅनलच्या माध्यमातून लोक न्यायालयाचे कामकाज करण्यात आले.

नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झाला कि ते नाते तुटप्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात केले जाते. मात्र लग्नाची ही नाती तुटू नयेत म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत न्यायालयही आटोकाट प्रयत्न करीत असते.
 
न्यायालयाने लोक अदालतच्या माध्यमातून नव्या प्रेमाचा समेट घडवून आणल्याने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या घटस्फोट प्रकरणापैकी तडजोडीअंती १७ जोडप्यांनी सन्मानपूर्वक घटस्फोट रद्द करून आपले संसार पुन्हा फुलविले आहेत.
 
एका दाखल पूर्व प्रकरणांमधील जोडप्याचा वाद कोर्टाची पायरी चढण्याअगोदरच मिटला आहे व त्यांचा संसार पुन्हा पूर्ववत फुलला आहे. असे ही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.