गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (11:46 IST)

उद्धव ठाकरेः शिवसेनेचा दसरा मेळावा, उद्धव ठाकरे काय बोलणार?

शिवसेनेचा परंपरागत 'दसरा मेळावा' आज संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्यातून शिवसैनिकांना उद्देशून भाषण करतील.
 
दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्क इथं होणाऱ्या दसरा मेळाव्याचं आयोजन गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात केलं जातं. गेल्यावर्षी (2020) सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता, तर यंदा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलाय.
 
षण्मुखानंद सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेतच सभागृहात शिवसैनिकांची उपस्थिती असेल. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मेळावा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
या मेळाव्याला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि संपर्कप्रमुख असे मोजकेच पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलीय.
 
उद्धव ठाकरे काय बोलणार?
मुख्यमंत्रिपदावर असल्यानं इतरवेळी उद्धव ठाकरे राजकीय भाष्य टाळतात. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेचा पक्षीय कार्यक्रम असल्यानं या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
विशेषत: काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या कार्यक्रमानंतर तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता अधिक आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रमात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांची व्यासपीठावरच जुगलबंदी महाराष्ट्राला पाहायला मिळाली.
 
मात्र, कार्यक्रम सरकारी असल्यानं तिथं दोघांनीही आवरतं घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आजचा मेळावा हा शिवसेनेचा पक्षाचा कार्यक्रम असल्यानं त्यात उद्धव ठाकरे राजकीय बोलण्याची शक्यता अधिक आहे.
 
तसंच, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ दसरा मेळाव्यातील भाषणाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे फोडणार का, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल.